बांगलादेशचे नाव बदलणार? राष्ट्रपतींनाही हटवणार? वाचा नक्की काय घडतय

Bangladesh constitutional changes: बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना पद सोडावे लागले होते. त्यांनी सध्या भारतात आश्रय घेतला आहे. त्यांच्याजागी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे नेतृत्व मोहम्मद युनूस करत आहे. शेख हसीना यांनी पद सोडले असले तरीही पुन्हा एकदा देशातील विद्यार्थी आंदोलन सक्रिय होत आहे. बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका येथील शहीद मिनार जवळ विद्यार्थी जमा होणार आहेत.
बांगलादेशातील कट्टरतावादी संघटना जमात-ए-इस्लामीने या कार्यक्रमाचा प्रचार केला आहे. बांगलादेशच्या नावात, संविधानात बदल,राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख ही पदेही रद्द करणे या सारख्या घोषणा विद्यार्थी नेत्यांकडून केल्या जाण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला जवळपास 30 लाख विद्यार्थी एकत्र येण्याची शक्यता आहे.
शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनाला जुलै क्रांती म्हणून घोषित करावे, अशी मागणी केली जात आहे. सरकारकडून विद्यार्थ्यांसोबत मिळून ही घोषणा केली जाण्याची शक्यता होती. परंतु, आमच्याकडून ही घोषणा केली जाईल, असे विद्यार्थी नेत्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनाला जुलै क्रांती म्हणून घोषित केले जाण्याची शक्यता आहे.
बांगलादेशचे नाव बदलणार?
विद्यार्थी नेत्यांची बांगलादेशच्या संविधानात बदल करण्याची मागणी आहे. 1972 ला तयार केलेल्या बांगलादेशच्या संविधान ‘मुजीबिस्ट चार्टर’ला रद्द केले जाईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यासाठी सर्वातआधी देशाचे नाव बदलले जाऊ शकते. रिपोर्टनुसार, इस्लामिक रिपब्लिक ऑफ बांग्लादेश, इस्लामिक खलाफ ऑफ बांग्लादेश आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ ईस्ट पाकिस्तान यापैकी एका नावाची घोषणा होऊ शकते.
बांगलादेशला इस्लामिक देश किंवा धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक देश घोषित केले जाऊ शकते. एवढेच नाही तर राष्ट्रपती आणि लष्कर प्रमुखांचा राजीनामा घेऊन ही पदे रद्द केली जाण्याचीही शक्यता आहे.





