Khalnayak Returns : ३३ वर्षांनंतर बल्लूचा कमबॅक; सलमान खान दिसणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत? महत्वाची अपडेट समोर
Khalnayak Returns : आता या सिक्वेलशी संबंधित आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

Khalnayak Returns : बॉलिवूडमधील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘खलनायक’चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल तीन दशकांनंतर अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा ‘खलनायक रिटर्न्स’च्या माध्यमातून बल्लू बलरामच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या सिक्वेलशी संबंधित आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.
अभिनेता सलमान खानदेखील या चित्रपटात झळकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे सलमान एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसू शकतो, अशी चर्चा आहे. वृत्तानुसार, चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. या भूमिकेसाठी सलमान खानचा विचार केला जात आहे.
मूळ ‘खलनायक’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे सुभाष घई सिक्वेलसाठी क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी लेखकांच्या टीमसोबत मिळून या पात्रावर चर्चा केली आहे. या महत्त्वपूर्ण सहाय्यक भूमिकेसाठी सलमान खान योग्य पर्याय असल्याचे निर्मात्यांना वाटते. मात्र, अद्याप सलमानच्या सहभागावर शिक्कामोर्तब झालेला नाही.
सलमान खानच्या चित्रपटातील संभाव्य एन्ट्रीबाबत चर्चा सुरू असतानाच दिग्दर्शक सुभाष घई यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आत्ताच काहीही सांगणं खूप घाईचं ठरेल. पटकथेचं काम सुरू आहे. संपूर्ण पटकथा तयार झाल्यानंतरच परिस्थितीचं स्पष्ट चित्र समोर येईल.”
जॅकी श्रॉफदेखील दिसणार?
१९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खलनायक’ या चित्रपटात संजय दत्तने बल्लू बलरामची भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता सिक्वेलमध्ये संजय दत्त पुन्हा एकदा बल्लूच्या भूमिकेत दिसणार असून जॅकी श्रॉफदेखील पुनरागमन करण्याची शक्यता आहे. ठरलेल्या प्रमाणे गोष्टी झाल्या तर संजय दत्त-सलमान खान-जॅकी श्रॅाफ या त्रिकुटाला अॅानस्क्रीन पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे
Gen Z Regelt Protest: फ्रान्सपाठोपाठ जर्मनीतही Gen-Z आंदोलनाला हिंसक वळण





