Pimpri-Chinchwad : ६० कोटींच्या देयकांचा चेंडू जीबीच्या कोर्टात
विषय सर्वसाधारण सभेकडे वर्ग केल्याने सुलभा उबाळे यांची टीका

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकातील उपसूचनांच्या माध्यमातून नियम डावलून ६० कोटी १८ लाख रुपयांची देयके अदा केल्याच्या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या उपनेत्या तथा नगरसेविका सुलभा उबाळे यांनी केली होती.
मात्र, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी हा विषय दप्तरी दाखल करून पुढील निर्णयासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे (जीबी) पाठविला आहे. त्यामुळे याचा निर्णय आता सर्वसाधारण सभेत होणार आहे. महापालिकेच्या वर्ष २०२५-२६ च्या सुधारित आणि २०२६-२७ च्या मूळ अंदाजपत्रकाला २४ मार्च २०२६ रोजी अंतिम मंजुरी देण्यात आली होती.
त्यानंतर काही नगरसेवकांनी नगरसचिव विभागामार्फत उपसूचना सादर करण्याची प्रक्रिया न पाळता थेट लेखा विभागाकडे १७ उपसूचना सादर केल्याचा आरोप आहे. त्यापैकी १४ उपसूचनांशी संबंधित ६० कोटी १८ लाख ६८ हजार ५३ रुपयांची देयके अदा करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे, या देयकांच्या अदा करण्याची कार्यवाही ३१ मार्च २०२६ रोजी झाल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद आहे.
या प्रकरणातील प्रक्रियेवर आक्षेप घेत सुलभा उबाळे यांनी संबंधित उपसूचना, मंजुरीचे आदेश, कामांची माहिती आणि देयकांची तपशीलवार चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी या विषयावर निर्णय घेण्याऐवजी तो दप्तरी दाखल करून सर्वसाधारण सभेकडे पाठविला असल्याचा आरोप उबाळे यांनी केला आहे.
६० कोटी रुपयांच्या देयकांचा विषय हा केवळ प्रशासकीय प्रक्रियेतील त्रुटीचा नसून सार्वजनिक निधीच्या विनियोगाशी संबंधित आहे. उपसूचना कोणत्या अधिकारात स्वीकारण्यात आल्या, त्यांची छाननी कोणी केली, देयकांना मान्यता कोणी दिली आणि अवघ्या काही दिवसांत इतक्या मोठ्या रकमेची बिले कशी अदा झाली, याची उत्तरे मिळणे आवश्यक असल्याचे उबाळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील १७ उपसूचनांच्या प्रती, त्यावरील मंजुरीचे आदेश, संबंधित कामांची माहिती, देयकांची यादी आणि देयके अदा करण्यास मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी उबाळे यांनी केली आहे.
तसेच संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून नियमबाह्य व्यवहार आढळल्यास संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘मागच्या वेळेस या विषयाबाबत प्रशासनाला त्या ठेकेदारांनी किती काम केले आहे. त्याची गुणवत्ता कशी आहे. याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. मात्र, तो अहवाल आला नव्हता. त्यामुळे तो तहकूब केला. मात्र, वारंवार हा विषय येत असल्याने शहरवासियांच्या मनात देखील शंका आहेत. त्यामुळे विषय दप्तरी दाखल केला आहे. त्यावर सर्वसाधारण सभेत चर्चा होईल.’ – अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती.
‘हा विषय दप्तरी दाखल करत जीबीकडे का पाठवला हे समजले नाही. कामांची चौकशी करणे किंवा त्याची गुणवत्ता तपासणे हा मूळ विषय नाही. तर चुकीच्या पद्धतीने उपसूचना देत ६० कोटींचे बिल अदा केले हा मूळ विषय आहे. त्यामध्ये कोणावर कारवाई झाली? जीबीमध्ये महापौर निर्णय घेतील, मात्र या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणे आवश्यक आहे.’ – सुलभा उबाळे, नगरसेविका, शिवसेना.





