वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी बलजीतसिंग यांची सेवा

प्रीतम पुरोहित/ज्ञानेश्वर फड
जेजुरी – माझा वारकरी येणार म्हणून वारीच्या तीन महिने आधीपासूनच बलजितसिंग तयारी सुरू करतात. त्यांची दुचाकी ते वारी काळात “बाइक ऍम्ब्युलन्स’ म्हणून वापरतात. मागील आठ वर्षांपासून ते निःशुल्क सेवा देत आहेत. “या काळात सेवा करणे हे मी स्वतःचे भाग्य मानतो, खूप समाधान आणि एक वेगळ्या प्रकारची आम्तशांती मिळते,’ असे बलजीतसिंग सांगतात. आतापर्यंत वारीमध्ये 600 पेक्षा जास्त वारकऱ्यांना त्यांनी आरोग्यसेवा पुरवली आहे.आषाढी वारीत आळंदी ते पंढरपूर हा 225 कि.मी. मार्ग वारकरी पायी पार करतात. यात सर्वाधिक संख्या ज्येष्ठ महिला-पुरुष वारकऱ्यांचा सहभाग असतो.
बलजितसिंग आणि टीम
बलजितसिंग यांच्यासोबत सेंट अँड्रु नर्सिंग महाविद्यालयाच्या 23 विद्यार्थिनी आरोग्य-सुश्रूषा सेवा देतात. प्रा. नायडू अणि पुणे आरटीओ अधिकारी अनिल वळीव यांच्या पुढाकाराने ही सेवा सुरू झाली. त्यांची संपूर्ण टीम आरोग्यदायी वारीसाठी झटत आहेत.
कोण आहेत बलजितसिंग
बलजितसिंग हे पुणे शहरातील रहिवासी आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार गरजूंची सेवा देताना जात-धर्म आडवा येत नाही. सेवा करून एक आत्म शांती मिळते. ती अधिक महत्त्वाची वाटते. व्यवसायाने ते विमा पॉलिसी सल्लागार आहेत. वारी आणि गणपती उत्सव या काळात ते ही सेवा पुरवितात. वाहनांचा खर्च, प्रथमोपचारासाठी औषधे, इंधनाचा खर्च ते स्वतः करतात.




