Special Story : बळीराजा सुखावणार! यंदा मॉन्सून लवकर…; महाराष्ट्रात पावसाचं चित्र काय असेल?

Monsoon Rain | Weather Update : मे महिन्याच्या सुरुवातीपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. उन्हाने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली होती. आता अचानक सुरू झालेल्या पावसाने थोडाफार दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवू लागला आहे. दुपारच्या वेळेत जोरदार वारेही सुटत आहेत, तसेच मधेमधे ढगाळ वातावरण तयार होत होते. अखेर कुठंतरी पावसाला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहेत. पावसाने वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. या पावसाने गरमीपासून नागरिकांची सुटका झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, दि. 13 मे रोजी हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांत निकोबार बेटांमध्ये मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या आहेत. तसंच पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा वाढता प्रभाव आणि इतर मानकं मान्सून आल्याचं दर्शवणारी आहेत. त्यामुळे निकोबार बेटे, दक्षिण अंदमान समुद्र तसंच बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागत मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं आहे.
तर, या वर्षी मान्सून नेहमीपेक्षा लवकर, म्हणजेच 27 मेच्या सुमारास केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लवकर पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसामुळे तापमानात घट झाली असली, तरी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास साधारणत 6 जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यापूर्वी मे महिन्यात वादळी पाऊस आणि अवकाळी पावसाचा मारा होऊ शकतो. तर 19 मे 2025 च्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि 7 ते 10 जूनपर्यंत मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच मे महिन्याच्या शेवटी IMD कडून अधिक तपशीलवार प्रादेशिक अंदाज जारी होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचे वितरण आणि तीव्रता याबाबत आणखी स्पष्टता येईल.
2025 मध्ये महाराष्ट्रात पाऊस कसा असेल?
महाराष्ट्रात 2025 च्या मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, जिथे पाऊस LPA च्या 110% पेक्षा जास्त असू शकतो. पावसाचे प्रमाण गेल्या वर्षीच्या 1252.1 मि.मी. पेक्षा समान किंवा जास्त असल्यास शेतीला चांगला फायदा होईल, परंतु पूर आणि भूस्खलनाच्या जोखमीकडे लक्ष द्यावे लागेल.
देशात किती पाऊस पडेल (सरासरी अंदाज) :
IMD ने अंदाज वर्तवला आहे की, जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत देशात सरासरीच्या 105% पाऊस पडेल, ज्याचा लॉन्ग पीरियड ॲव्हरेज (LPA) 87 सें.मी. (870 मि.मी.) असून, थोड्याफार प्रमाणात त्रुटी सुद्धा जाणवतील. IMD ने विशिष्ट मिलिमीटरमध्ये पावसाचे प्रमाण जाहीर केलेले नाही, परंतु गेल्या वर्षी (2024) महाराष्ट्रात 1252.1 मि.मी. पाऊस नोंदवला गेला, जो सरासरीपेक्षा 26% जास्त होता. यंदा देखील असाच किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.
‘मान्सून’ हा शब्द नेमका कुठून आला?
काही भाषातज्ज्ञांच्या मते, ‘मान्सून’ या शब्दाचं मूळ अरबी भाषेतल्या ‘मौसीम’ या शब्दात आहे. मौसीम म्हणजे मोसमी वारे किंवा ऋतूनुसार वाहणारे वारे. दक्षिण आशियात ठराविक काळात मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. इतका की त्या काळाला पावसाळ्याचा ऋतू म्हणून इथे स्वतंत्र ओळख मिळाली आहे. याच मोसमी वाऱ्यांसाठी मान्सून हा शब्द ब्रिटिशकालीन भारतात वापरला जाऊ लागला.
भारतात जून ते सप्टेंबर या काळात वारे नैऋत्य दिशेकडून म्हणजे साधारण अरबी समुद्राकडून हिमालयाकडे वाहतात. या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. तर दुसरीकडे ऑक्टोबर महिन्यात वारे याच्या उलट दिशेने म्हणजे ईशान्येकडून वाहतात त्यांना ईशान्य मोसमी वारे किंवा ईशान्य मान्सून म्हणतात.
मान्सूनमुळे किती पाऊस पडतो?
भारतात साधारण 80 टक्के पाऊस हा नैऋत्य मान्सूनमुळे पडतो तर साधारण 11% पाऊस ईशान्य मान्सूनमुळे पडतो असं हवामान खात्याच्या नोंदी सांगतात. या दोन्ही वातावरणात पावसाचा जोर कमीजास्त प्रमाणात होताना दिसून येतो.
नागरिकांसाठी सूचना :
पावसामुळे काही भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाहनचालकांनी काळजी घ्यावी. घराच्या आसपास पाणी साचू नये, याची काळजी घ्यावी, कारण त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊ शकते आणि गंभीर आजार होण्याची मोठी शक्यता असते. अश्या वातावरणात नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे फार महत्वाचे ठरते.
याच बरोबर शहरातील महानगरपालिकेने डास नियंत्रणासाठी फॉगिंग आणि कचरा व्यवस्थापनाची कामे सुरू केली आहेत. ज्यामुळे संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर आणि रोगमुक्त राहील. यासोबतच हवामान खात्याच्या मे अखेरीस येणाऱ्या अद्ययावत अंदाजाकडे लक्ष ठेवणे गरजेचे असणार आहे.










