हिंगोली जिल्ह्यातील बळीराजा संकटात ! पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात; पिके लागली सुकायला

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. अनेक ठिकाणी पावसाने संपूर्ण ऑगस्ट महिना विश्रांती घेतली. त्यातच हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात म्हणावा तसा एकदाही पाऊस झाला नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. सद्यःस्थितीत तापमान कमाल ३२ तर किमान २४ अंशावर आहे. जून महिन्यात पेरणीच्या काळात तर पाऊस आला नाही, त्यामुळे जुलै महिन्यात काही अंशी आलेल्या तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर काही दिवस भिज पावसाने पिके जमिनीवर आली खरी, परंतु त्यानंतर गायब झालेला पाऊस आणि कडक उन्हाने पीक सुकत चालली असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी, वसमत तालुक्यातील डोंगराळ भागातील हलक्या जमिनीत अजिबात ओलावा राहिला नाही. त्यामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. पावसाने दडी दिल्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, हळद, तूर आदी पिकांनी ऊन धरले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे ते शेतकरी पिके वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. परंतु, विज पुरवठा सुरळीतपणे नाही, त्यांना अडचणी येत आहेत. विहिर बोअर तलाव देखील अद्यापही पूर्ण भरले नाहीत.
जवळपास गेल्या पंधरा ते वीस दिवसा पासून पावसाचा खंड पडला आहे. आता सोयाबीन पिक हे सध्या फुलांच्या अवस्थेत आहे त्यामुळे शेतकरी आत्ता पावसाची वाट पाहत आहे. पाऊस नसल्याने सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा, साखरा, केलसुला, घोरदरी, घोतरा, खडकी, बोरखेडी हा भाग डोंगराळ असल्यामुळे पूर्ण सोयाबीन पावसा अभावी जळून जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तत्काळ पंचनामे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
“अगोदरच दुबार पेरणी साठी सावकाराकडून पैस काढून रिमझिम पावसावर दुबार पेरणी केली आणि आत्ता पावसा अभावी सोयाबीन वाळून जात आहें मी माझ्या शेतात कृषी विभागाकडून परमिट वर महाबीज बियाणे लागवड केले मात्र सदर बियाणे बोगस निघाले त्यामुळे माझ्यावर दुबार पेरणीचे संकट आले होते आणि आत्ता गेल्या पंधरा ते वीस दिवसा पासून पावसाने उघडीप दिल्यामुळे माझ्या शेतातील सोयाबीन करपूण जात आहें आत्ता खरीपाची पिके आतची गेली तर वर्षभर काय खानार दुःख आहें लेकराचे शिक्षण असे लोकांचे घेतलेले पैसे कसे परत करणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांला सतत परेशान करत आहेत त्यामुळे प्रशासनाच्या वतीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी”
शरद निरगुडे (ग्रामपंचायत सदस्य, हिवरखेडा, .ता सेनगाव.)





