बाळासाहेबांचे वारसदार उद्धवच, राज ठाकरे नव्हे; केंद्रीय मंत्र्यांचं विधान

मुंबई – राज ठाकरे हे एका पक्षाचे मुख्य नेते आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत, पण ते त्यांचे वारसदार नाहीत. बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार उद्धव ठाकरे आहेत, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी निशाणा साधला. तसे. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे वारसदार असूनही आमच्यासोबत येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणाचे पडसाद अद्यापही पडत आहेत. मशिदींवरचे अजानचे भोंगे न हटवल्यास त्यांच्यापुढे मोठ्या आवाजात मंदिरांवर हनुमान चालिसा लावली जाईल, अशा आशयाचे विधान राज ठाकरे यांनी केले होते.
त्यानंतर राज्यातल्या विविध पक्षांच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. याच संदर्भात केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनीही भाष्य केले आहे.
रामदास आठवले म्हणाले,कोणाला लाऊडस्पीकर लावायचा असेल, मंदिरांवर लाऊडस्पीकर लावायचा असेल तर हरकत नाही. काही मंदिरांवर लाऊडस्पीकर आहेत. त्यामुळे मशिदीवर जे त्यांचे परंपरागत लाऊडस्पीकर लावलेले आहेत. ते लावतायत म्हणून आम्ही लावू अशी भूमिका घेणे योग्य नाही. पूर्वीपासून ज्या ठिकाणी भोंगे आहेत, तिथे आहेत, मंदिरांवरही लाऊडस्पीकर असल्याचे आम्ही पाहिले आहे. त्यामुळे विरोधाला विरोध करण्याची भूमिका योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.





