मेळावा, नियुक्त्यांमुळे बाळासाहेबांची शिवसेना सक्रीय

पिंपरी-चिंचवड शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करतानाच कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा लवकरच होणार असल्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षदेखील सक्रीय झाल्याचे पहावयास मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत खा. श्रीरंग बारणे यांचे कोणीही समर्थक गेले नसल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना शहरात मोठी असल्याचे चित्र त्यांनी केले. परिणामी पक्षाची ढासळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी खा. श्रीरंग बारणे समर्थकांनी प्रयत्न करण्यास सुरूवात केली. सुरूवातीच्या टप्प्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला अल्प प्रमाणात का होईना परंतू यश आले. यानंतर आपल्या सोबत आलेल्या समर्थकांचा उत्साह कायम रहावा, शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची ताकद दिसावी यासाठी मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले.
चिंचवडच्या ऑटो क्लस्टर येथे झालेल्या मेळाव्याला मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वच पदाधिकारी उपस्थित राहिले होते. या मेळाव्यात पक्षाची पुढील दिशा काय असेल या बाबत उपस्थितांनी मार्गदर्शन केले. तसेच पदाधिकाऱ्यांची नियुक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याच्या सूचनाही करण्यात आल्याने आतापर्यंत नावापुरता असलेला हा पक्ष सक्रीय झाल्याचे पहावयास मिळत आहे.
कार्यकर्त्यांना संधी मिळणार
बाळासाहेबांच्या शिवसेनेत काम करणाऱ्या प्रमूख कार्यकर्त्यांना राज्य पातळीवरची पदे देऊन त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विविध समित्या व महामंडळांवर कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे. एमआयडीसी, अल्पसंख्यांक विभाग यासह काही महामंडळावर कार्यकर्त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्या बाबत नावे देखील अंतिम करण्यात आली असून त्या बाबत लवकरच नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावा
ऑटो क्लस्टर येथे झालेला पदाधिकारी नियुक्ती मेळावा ही सुरुवात असल्याचे सांगण्यात आले. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ घेऊन शहरात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्याचा निश्चय खा. श्रीरंग बारणे यांच्या समर्थकांनी केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या मेळाव्यासाठी तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडल्यास त्याचा पक्षाला किती फायदा होईल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





