Anjali Damania : दमानियांच्या खात्यावर 25 कोटींचा बॅलन्स; राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांचा आरोप

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान पेटवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या खात्यावर 25 कोटींचा बॅलन्स टाकण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केला आहे. त्यांनी यासंबंधीची माहिती पुराव्यांसकट उघड करण्याचा इशाराही दमानिया यांना दिला आहे. दरम्यान, अंजली दमानिया यांनी सूरज चव्हाण यांचे आरोप धूडकावून लावत सरकारला थेट आपले बँक अकाउंट तपासण्याचे आव्हान दिले आहे.
दमानियांनी सरपंच संतोष देशमुख हत्याकांड व कृषि घोटाळ्यावरून मंत्री धनंजय मुंडे यांची पुरती कोंडी केली आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रिमंडळाची मंजुरी नसताना खोटा शासन आदेश काढून कृषि खात्याची शेकडो कोटींची रक्कम लाटल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर सूरज चव्हाण यांनी उपरोक्त इशारा दिला आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईच्या खात्यावर 25 खोक्यांचा बॅलन्स टाकण्यात आला आहे. काहीही काम न करता वर्षाला 15 देश फिरणाऱ्या आणि अडीच कोटी रुपयांचा टॅक्स भरणाऱ्या स्वयंघोषित समाजसेविका ताई, कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला हे आम्ही पुराव्यांसह लवकरच बाहेर काढू, असा इशारा सूरज चव्हाण यांनी आपल्या एका पोस्टद्वारे दिला आहे.
अंजली दमानिया यांचे बँक अकाउंट तपासण्याचे थेट आव्हान
या प्रकरणी दमानिया आपला संताप व्यक्त करताना म्हणाल्या, खूप राग आला आहे, तरीही मी माझ्या भाषेची पातळी सोडणार नाही. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांना माझा थेट आव्हान. ताबडतोब माझी सगळीच्या सगळ्या खाती सरकारने तपासावी. कुठेही एक दमडी देखील न मोजलेली आहे का ते पाहावे? असे आव्हानच त्यांनी दिले.





