पुणे जिल्हा | भारनियमनामुळे वाढतोय एकोपा

राहू (वार्ताहर) – प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात.त्यात एक चांगली तर एक वाईट बाजू असते. त्याचा प्रत्यय सध्या ग्रामीण भागात येत आहे. सध्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सायंकाळी चार ते रात्री बारा असे भारनियमन (लोडशेडिंग) असते. त्यामुळे नागरिक सायंकाळी सातनंतर चौकात किंवा चावडीवर कमीत कमी तास दोन तास गप्पा मारताना आढळून येत असल्याने भारनियमनामुळे एकोपा वाढण्यास मदत होत असल्याची चर्चा सध्या दौंड तालुक्याच्या गावागावांत सुरू आहे.
सायंकाळी टीव्ही बघणे किंवा मोबाइलमध्ये मनूष्य सध्या गढून गेला आहे. त्यातच एखाद्याला समोरासमोर बोलायचे म्हटले तरी मोबाइलमुळे ते शक्य होत नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये एकाकीपणा वाढत आहेत. परंतु सध्या भारनियमन आणि लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने कमीतकमी नागरिक एकत्र येत गप्पा तरी मारत विचारांची आदानप्रदान होत असल्याने माणसाचा एकाकीपणा नाहिसा होण्यास मदत होत असल्याने जे होते ते चांगल्यासाठीच अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
रात्री नऊवाजता वीज येणे अपेक्षित
भारनियमनामुळे एकोपा वाढत असेल तर चांगली बाबत आहे; पण कमीत कमी रात्री नऊ वाजता वीज येणे गरजेचे आहे, कारण रात्री 12 म्हणजे खूपच उशीर होत आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक निशाचरप्राणी गरमीमुळे बाहेर येत आहेत.
ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी अनेक पडक्या वास्तू आहेत त्यामुळे सापासारख्या प्राण्यांची भीती असते तसेच सांडपाण्यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे त्यामुळे किमान रात्री नऊ वाजत तरी वीज द्यावी अशी माफक अपेक्षा नागरिकांची आहे.





