Bala Nandgaonkar : प्रेम टिकवायचं का नाही हे ठाकरे बंधूंनी ठरवावे; बाळा नांदगावकर यांचे मोठे वक्तव्य

ठाणे : हिंदी सक्तीच्या विषयाला धरुन आम्ही पुढे निघालो आहोत. यात, महापालिका निवडणूकांचा कोणताही विषय नाही. महापालिका निवडणूका अजून खूप लांब आहेत. अद्याप निवडणूकांची तारिख नक्की झालेली नाही. परंतु, विरोधकांचे काम आहे, कोणतेही अर्थ काढायचे. त्याना कोणी रोखू शकत नाही. हे प्रेम टिकवायचं का नाही हे ठाकरे बंधूंनी ठरवावे, असे वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केले.
ठाण्यामध्ये मनसे पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यावर भाष्य केले असून अनेक राजकीय विषयांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. बाळा नांदगावकर म्हणाले की, सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय घेतला नसता तर, पुढचे काही घडलेच नसते. हिंदी सक्ती केली तर, मराठी माणूस उठून पेटणारचं होता. यामध्ये तर सर्वांना राज ठाकरे यांचा स्वभाव माहितच आहे. ते मराठीविषयी कोणतीही तडजोड करत नाहीत. त्याचबरोबर मीरा भाईंदर रस्त्यावर झालेल्या आंदोलनाच्या पूर्वीच अविनाश जाधव यांना स्थानबद्ध करण्यात आले.
याबाबत नांदगावकर म्हणाले की, अविनाश जाधव हा आमचा उद्धवय्या माणूस आहे. त्याने मिरा भाईंदरमध्ये घेतलेला मोर्चा चुकीचा नव्हता, तो योग्यच होता. त्या मोर्चाला रितसर परवानगी दिली असती तर गोंधळ झाला नसता. आमचे कार्यकर्ते जे काही करत आहेत ते उत्तमप्रकारे करत आहेत. परंतु, कार्यकर्त्यांनी त्यांच्यात असलेली ऊर्जा कुठेही वाया घालवू नये, समाजाच्या हितासाठी जे जे काही करता येईल ते-ते करावे, असेही ते म्हणाले.





