Bala Nanadgaonkar : राज आणि उद्धव ठाकरेंसाठी बाळा नांदगावकरांनी केली ‘ही’ भावनिक पोस्ट

मुंबई: मराठी विजयोत्सवाच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले. या ऐतिहासिक क्षणामुळे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. महाराष्ट्रातील मराठी जनतेची ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही दीर्घकालीन अपेक्षा पूर्ण झाल्याचे दिसून आले. मराठी मेळाव्यात ठाकरे बंधूंनी दाखवलेली एकीची वज्रमूठ महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कायम राहावी आणि आगामी निवडणुका तसेच राजकीय आव्हाने दोन्ही बंधूंनी एकत्रितपणे सामोरे जावेत, अशी भावना संपूर्ण महाराष्ट्रातून व्यक्त होत आहे.
या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एक भावनिक फेसबूक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. नांदगावकर यांनी अनेकदा ठाकरे बंधूंच्या एकीचे प्रयत्न केले होते. एका मुलाखतीत त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते, त्या भावनेची पुनरावृत्ती शनिवारी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे पाहून झाली.
नांदगावकर यांनी ठाकरे कुटुंबाचा एकत्रित फोटो शेअर करत लिहिले, “याचसाठी केला होता अट्टाहास! गेल्या दोन दशकांपासून ज्या सुवर्ण क्षणाची वाट पाहत होतो, तो आज आला आणि कायमचा मनात घर करून गेला. मा. बाळासाहेब ठाकरे जिथे असतील तिथून हा क्षण आनंदाने पाहत असतील. राजकीय महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून मी केवळ ठाकरे कुटुंब एकत्र दिसावे यासाठी वाटचाल केली. आज, आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी, हे प्रत्यक्षात आले आणि माझा आनंद द्विगुणित झाला. आता पांडुरंगाकडे एकच मागणे आहे, ही एकी अशीच कायम राहू दे.” या पोस्टद्वारे नांदगावकर यांनी ठाकरे बंधूंच्या एकीमुळे निर्माण झालेल्या आनंदाला आणि मराठी जनतेच्या अपेक्षांना वाचा फोडली आहे.





