Bajaj Auto: बजाज ऑटोकडून धूर निघालेल्या वाहनाची कसून चौकशी

मुंबई – बजाज ऑटोचे इलेक्ट्रिक वाहन असलेल्या चेतक स्कूटरच्या एका भागात छत्रपती संभाजीनगर येथे 5 डिसेंबर रोजी धूर निघाल्याची घटना घडली आहे. ही बाब कंपनीने गंभीररीत्या घेतली असून या घडलेल्या प्रकाराची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे कंपनीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
कंपनीच्या दृष्टिकोनातून ग्राहकाची सुरक्षा हा सर्वात मोठा मुद्दा आहे. त्याबाबत कंपनी कसलीही तडजोड करत नाही. या प्रकरणाची शहानिशा करून असा प्रकार पुन्हा घडणार नाही यासाठी योग्य उपाययोजना करण्यास कंपनी कटिबद्ध आहे. 5 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे चेतक स्कूटरच्या एका भागातून दूर निघाल्यानंतर आमच्या वितरकांनी संबंधित स्कूटर सेवा केंद्रावर नेली आणि तपशिलात चौकशी सुरू केली आहे.
या घटनेत कोणालाही इजा झालेले नाही. स्कूटरच्या एका प्लास्टिकच्या भागातून दूर निघाला. या स्कूटरची बॅटरी आणि इंजिन पूर्णपणे शाबूत आहे. बॅटरी पॅक मध्ये वापरलेले मटेरियल अशा वेळी सुरक्षिततेची काळजी घेते असे कंपनीने म्हटले आहे.
आम्ही ही बाब गांभीर्याने घेतली असून हा प्रकार नेमका कसल्या तांत्रिक कारणामुळे झाला याचा शोध घेण्यात येत आहे. ही त्रुटी दुरुस्त करण्यात येणार आहे. कंपनीच्या ग्राहकांनी आपल्या वाहनांचेसुटे भाग अधिकृत विक्रेत्याकडून घ्यावे. वाहनाची देखभाल अधिकृत सेवा केंद्रातूनच करावी. त्यामुळे वाहनाचा दर्जा अबाधित राहण्यास मदत होते असे कंपनीने ग्राहकांना सांगितले आहे.





