लालूंना जामीन; पण राहावे लागणार कारागृहातच

पाटणा – चारा घोटाळ्याच्या एका प्रकरणात राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांना झारखंड हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे, पण त्यांना अन्य प्रकरणात शिक्षा झाली असल्याने त्यांची कारागृहातून मात्र सुटका होणार नाही.
त्यांना जो जामीन मंजूर करण्यात आला आहे तो चैबासा ट्रेझरीतून पैसे काढण्यात आल्याच्या प्रकरणातील आहे. या ट्रेझरीतून त्यांनी 33 कोटी 67 लाख रुपये गैरमार्गाने काढले होते असा आरोप आहे.
तथापि, दुमका ट्रेझरीतून गैरमार्गाने काढण्यात आलेल्या पैशाच्या प्रकरणात त्यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली असल्याने त्यांना या प्रकरणात जामीन मिळाला असला तरी त्यांची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता नाही.
झारखंड हायकोर्टाने त्यांना प्रत्येकी 50 हजारांचे दोन जामीन आणि दोन लाख रुपयांची रक्कम कोर्टात भरण्याचा आदेश दिला असून त्या अटींवर त्यांना हा जामीन मंजूर झाला आहे. देवघर ट्रेझरीतून चाऱ्याच्या नावाखाली काढण्यात आलेल्या पैशाच्या प्रकरणातही लालूंना या आधी जामीन मंजूर झाला आहे.





