मुंबई – ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून कोठडीत असणारे बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम उर्फ डी. एस. कुलकर्णी यांच्या पत्नी हेमंती यांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. त्याचवेळी डी. एस. कुलकर्णी यांचा जामीन अर्ज मात्र फेटाळण्यात आला.
डी. एस. कुलकर्णी यांना ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. डी. एस. कुलकर्णी यांना जामीन नाकारण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यात येणार असल्याचे त्यांचे वकील अशुतोष श्रीवास्तव यांनी सांगितले.
या दोघांच्या जामीन अर्जावर न्या. डी. पी. नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी शुक्रवारी झाली होती. न्यायालयाने त्यावरील निकाल राखून ठेवला होता. तो मंगळवारी देण्यात आला.
ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, बंधू मकरंद, पुतणी, जावई यांना अटक करण्यात आली आहे. 17 फेब्रुवारी 2018 पासून दीपक कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती पोलिसांच्या ताब्यात आहेत.
न्यायालयाने यापुर्वी मकरंद यांना जामीन मंजूर केला. विशेष न्यायालयाने डीएसके आणि हेमंती यांचा जामीन अर्ज जून महिन्यामध्ये फेटाळून लावला होता. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.
कुलकर्णी यांनी ठेवीदारांची 2 हजार 43 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका दोषारोपपत्रात ठेवण्यात आला आहे. तर एकूण 33 हजार ठेवीदारांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. अंमलबजावणी संचनालयाने न्यायालयाच्या परवानगीनंतर कुलकर्णी यांची चौकशी केली होती.