Bahelia tribe : बहेलिया टोळीचा इतिहास काय? अशी करतात वाघांची शिकार अन अवयवांची तस्करी… वाचून अंगावर काटा येईल

गेल्या चार महिन्यांमध्ये १५ वाघांची शिकार झाली असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे पुन्हा एकदा वाघांच्या शिकारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाघांची शिकार करून त्यांच्या अवयवांची तस्करी मध्य प्रदेशामार्गे चीनला केली जात असल्याचे समोर आले. या शिकारीमागे बहेलिया (फासेपारधी) टोळी असल्याची उघड झाले आहे. ही टोळी कार्यरत ठेवण्यासाठी परदेशातून अॅापरेटिंग केली जाते, असे वन खात्याने केलेल्या तपासात समोर आले आहे.
आतापर्यंत या शिकार प्रकरणात ११ जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड झाले आहे. या प्रकरणात वन विभागाने शिकारीसाठी कुख्यात असलेल्या अजित राजगोंड याला अटक केली आहे. या प्रकरणाची वन विभागाकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. यामुळे बहेलिया टोळी वाघांची शिकार कशी करते, वाघांची शिकार करून त्यांच्या अवयवांचे पुढे काय केले जाते, आदी माहिती विस्ताराने जाणून घेऊयात…..
वाघांचा अधिवास धोक्यात!
वाघाला जंगलाचा राजा म्हटले जाते. मात्र, वाघांचा अधिवासाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वाघांच्या शिकारी संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे वाघांच्या मुक्त संचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या चार महिन्यांत बहेलिया टोळीकडून तब्बल १५ वाघांची तस्करी झाल्याची माहिती वनविभागाच्या तपासात पुढे आली आहे. हा आकडा वाढू देखील शकतो असे सांगण्यात आले आहे. वाघांची शिकार करून त्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या अजित राजगोंडला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफिने सापळा रचून अटक केली. या तपासात बहेलिया टोळी आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा शोध लावण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे.
अशी केली अजित राजगोंडला अटक
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात बहेलिया टोळीचा मुख्य आरोपी अजित राजगोंड याला वनविभागाच्या विशेष तपास पथकातील अधिकाऱ्यांनी जानेवारी महिन्यात अटक केली. त्यानंतर या टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांची गंभीर माहिती समोर आली. ही शिकारी टोळी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. यानंतर अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे वेगवान गतीने फिरवली. यामध्ये भारतातील मिझोराम आणि मेघालय राज्यांतून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. जमखानकप, निंग सॅन लुन आणि लालनेईसंग असे या आरोपींचे नावे आहेत. हे तिघे म्यानमार मार्गे वाघांची चीनला तस्करी करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
राजगोंडच्या झोपडीत काय सापडलं?
वन विभागाच्या विशेष तपास पथकाने गोपनीय सूत्रांच्या माहिती घेऊन बहेलिया टोळीतील मुख्य आरोपी अजित राजगोंडला जानेवारी महिन्यात सापळा रचून अटक केली. राजगोंडच्या झोपडीत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना साहित्य सापडले आहे. हे साहित्य जप्त करण्यात आले असून नागपूर आणि हैद्राबाद येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यामध्ये दात आणि केस वाघाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या तरी या टोळीने एका वाघाची शिकार केली असल्याचे स्कृतदर्शीनी पुराव्यावरून स्पष्ट झाल्याचे सांगण्यात येत आहे. आणखी दुसरे अवयव सापडले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. या टोळीने अधिक वाघांची शिकार केल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
बहिलेया टोळीचे कारनामे
बहेलिया टोळी गेल्या दोन दशकांपासून मध्य भारतात सक्रिय आहे. चीनमध्ये तस्करी केलेले सर्व वाघ मध्य प्रदेश आणि विदर्भातील होते. २०१० साली अजित राजगोंड आणि त्याच्या भावला नागपूर रेल्वे स्थानकात वाघाच्या कातडीसह अटक करण्यात आली होती. २०१२ आणि २०१३ या वर्षांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, त्यात ठोस असे काहीही आतापर्यंत हाती लागलेले नाही. २०१३ आणि २०१५ या वर्षांमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पात किमान १९ वाघांची शिकार करण्यात आली होती. ही शिकार बहेलिया टोळीतील सदस्यांनी केली असल्याचा दाट संशय वन खात्यातील अधिकाऱ्यांना आहे.
बहेलियांचा इतिहास काय? शिकार कशी करतात?
बहेलिया टोळीला फासेपारधी असे देखील संबोधले जाते. या जमातीचे वास्तव्य मध्य प्रदेशातील कटनी आणि आसपासच्या परिसरात असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. बहेलिया टोळीतीलव सदस्यांसाठी होळी हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. या टोळीतील लोक भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असले तरी ते या सणादिवशी एकत्र येतात. होळी संपल्यानंतर टोळीचा मुखिया त्यांना वाघांच्या शिकारीसाठीच्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे वाटप करतो.
ज्या ठिकाणी या टोळीतील सदस्यांनी क्षेत्र निवडले आहे. त्यासाठी हे सदस्य तेथील जंगल आणि गावच्या सीमेवर तंबू ठोकून वास्तव्य करतात. त्यांच्या महिला खेळणी विक्री करतात, तर पुरुष मंडळी अवजारांची निर्मिती करतात. त्या अवजारांना धार लावून देण्याची कामही ते करतात. हे सदस्य जंगलाचा बारकाईने अभ्यास करतात. वाघासाठी कॅटनी ट्रॅप लावतात. त्या ट्रॅपमध्ये वाघ अडकल्यानंतर त्याच्या तोंडात भाला अथवा बांबू टाकून त्याला मारले जाते. त्यानंतर अवघ्या तासाभरानंतर त्याची कातडी सोलण्यापासून त्याचे दात, नखे आणि हाडे वेगळी केली जातात. हे करताना ही टोळी मागे कोणताही पुरावा सोडत नाही.
१६० वाघांची शिकार
२१ फेब्रुवारीला अॅड. सुधीर तोडीतेल यांनी गेल्या ५ वर्षांत विदर्भात १६० वाघांचे मृत्यू झाल्याची बाब मुंबई हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार नागपूर खंडपीठाने पुढच्या तीन आठवड्यात वाघांच्या मृत्यूसंदर्भात सर्व माहिती कोर्टासमोर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात महाराष्ट्र वनविभागासोबतच केंद्रीय वन विभाग, सीबीआय, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (NTCA) आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण संस्थेलाही (WCCB) प्रतिवादी करण्यात आले आहे. पूर्वोत्तर राज्यातून अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींच्या चौकशीतून चीनमध्ये तस्करी करण्यात आलेले सर्व वाघ हे मध्य प्रदेश आणि विदर्भातीलच असल्याची माहीती सूत्रांकडून मिळत आहे.
वनविभागावर ताशेरे
भारतात वाघांच्या सरंक्षणासाठी प्रगत तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येतो. पण वाघांची शिकार रोखण्यात वनविभागाल अद्यापर्यंत यश आलेले नाही. यामुळे वाघांच्या अधिवासाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे वाघांची शिकार आणि तस्करीचा प्रश्न गंभीर बनला असून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीवर कठोर कारवाई करणे आणि वनविभागाच्या कार्यक्षमतेवर पुनर्विचार करणे ही काळाची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. ही टोळी फक्त विदर्भ आणि मध्य भारतातच नाही, तर दक्षिण भारतासह देशभरात सक्रीय आहे. त्यामुळे देशभरातील व्याघ्र प्रकल्पांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
वाघांची संख्या किती?
२०२२ वाघांच्या जनगणेनुसार देशातील एकूण वाघांची संख्या २१६७ इतकी आहे. मध्य प्रदेशात वाघांची संख्या सर्वाधिक म्हणजे ७८५ इतकी आहे. वाघांच्या संख्येनुसार देशात महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे, राज्यातील एकूण वाघांची संख्या ४४४ इतकी आहे.
२०१३ चे प्रकरण
मेळघातील गुगामल वन्यजीव विभागाच्या ढाकणा वनपरिक्षेत्रात २०१३ साली एका वाघाच्या शिकारीत मध्य प्रदेशातील बहेलिया टोळीचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. यामध्ये स्थानिक शिकारी , व्यापारी आणि आंतरराज्यातील तस्कर यांचे त्रिकूट असल्याचे तपासात समोर आले होते. या प्रकरणी ६ संशयितांना अटकही करण्यात आली होती. आरोपींवर भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२, भारतीय वनकायदा १९२७ आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार कारवाई देखील करण्यात आली होती.





