Badrinath Helicopter Crash : उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह 6 जणांचा मृत्यू, सर्व मृतदेह सापडले
Badrinath Helicopter Crash : उत्तराखंडमधील जोशीमठजवळ बदरीनाथहून देहरादूनला परतणारे हेलिकॉप्टर कोसळले. पायलटसह सहा जणांचा मृत्यू झाला असून सर्व मृतदेह सापडले आहेत.

Badrinath Helicopter Crash : बद्रीनाथ धाम येथून देहरादूनला परतणारे हेलिकॉप्टर शुक्रवारी (३० ऑक्टोबर) जोशीमठजवळ कोसळले. या दुर्घटनेत पायलटसह हेलिकॉप्टरमधील सहा जणांचा मृत्यू झाला. सर्व सहा जणांचे मृतदेह बचाव पथकांना सापडले आहेत. दुर्गम भागात हा अपघात झाल्याने मृतदेह रस्त्यापर्यंत आणण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
पोलिस अधीक्षक सुरजीत सिंह पवार यांनी या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. पोलिस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), लष्कर आणि आयटीबीपीची पथके घटनास्थळी दाखल झाली होती. हेलिकॉप्टरमध्ये पायलट हिमांशू यांच्यासह प्रतापा, अरुण सालुंके, शंकरगौडा व्ही. जी., सुधीर के. आणि एच. एस. नागराजा हे प्रवास करत होते. सर्व प्रवासी बंगळुरू येथील असल्याची माहिती आहे.
ट्रान्स भारत एव्हिएशन कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. शुक्रवारी दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी बदरीनाथ येथून देहरादूनमधील सहस्रधारा हेलीपॅडच्या दिशेने हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. सुमारे १५ मिनिटांनंतर हेलिकॉप्टरचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क तुटला. त्यानंतर हेलिकॉप्टरचा शोध सुरू करण्यात आला. जोशीमठमधील चाई गावाजवळ त्याचे शेवटचे लोकेशन मिळाले होते.
चाई गांव, जोशीमठ के निकट हेलीकॉप्टर क्रैश होने की दुर्भाग्यपूर्ण सूचना प्राप्त हुई है। जिला प्रशासन, आपदा प्रबंधन विभाग, एसडीआरएफ द्वारा संयुक्त रूप से रेस्क्यू ऑपरेशन चलाया जा रहा है।
स्वयं भी पूरे घटनाक्रम की निरंतर निगरानी कर रहा हूं। गंभीर रूप से घायलों को तत्काल एयरलिफ्ट कर बेहतर उपचार हेतु हायर सेंटर पहुंचाने के निर्देश दिए हैं।
ईश्वर से यात्रियों के सकुशल होने की कामना करता हूं।
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) October 30, 2026
बर्फवृष्टीमुळे बचावकार्यात अडथळे –
अपघात झालेल्या परिसरातील काही डोंगरांवर हलकी बर्फवृष्टी सुरू होती. त्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. हेलिकॉप्टर डोंगरावरील खडकाला धडकून कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त –
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग बचावकार्यावर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःही संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





