बदलापूर घटनेमुळे महाराष्ट्राच्या लौकिकाला धक्का

पुणे – राज्यातील महिला भगिनींसह मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारवर आहे. मात्र, राज्य सरकारला कोणत्याही संवेदनशील घटनेची जाण नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांनी राज्य सरकारवर केली. बदलापूरच्या घटनेमुळे महाराष्ट्राच्या लौकिकाला धक्का बसला असून, या घटनेचा निषेध होत असताना इतर ठिकाणीही अशा घटना होत असल्याची खंतही पवार यांनी व्यक्त केली.
बदलापूरमधील घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने भरपावसात शनिवारी (दि. २४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर तोंडाला काळी पट्टी बांधून मूक आंदोलन करुन सरकारचा निषेध व्यक्त केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महिलांच्या सुरक्षिततेविषयी उपस्थितांना शरद पवार यांनी शपथ दिली.
खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार वंदना चव्हाण, आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादी काॅग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँगेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना (उद्धव ठाकरे) शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी आमदार मोहन जोशी, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर यासह महाविकास आघडीतील सर्वपक्षीय नेते यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात, त्या काळात एका भगिनीवर अत्याचार केल्याची तक्रार छत्रपती शिवाजी महाराजांकडे येताच त्यांनी त्याचे हात कलम करण्याचे आदेश दिले आणि त्याला त्याच्या कर्माची शिक्षा दिली. तसेच आता जे काही घडले, त्याची गांभिर्याने नोंद सरकारने घेतली पाहिजे. संवेदनशीलपणे या गोष्टी हाताळल्या पाहिजेत. अत्याचाराच्या घटना होत असतील आणि त्याच्या विरोधात आवाज उचलणे म्हणजे राजकारण करतो असे सत्ताधार्यांचे म्हणणे आहे. हे सरकार असंवेदनशील आहे.
सुळे म्हणाल्या, आपण महाराष्ट्रातील मुलींच्या सुरक्षेसाठी काम करायचे आहे. तसेच जोपर्यंत त्या व्यक्तीला फाशी होत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही. बदलापूरला आलेले लोक बाहेरचे होते, असे सरकार म्हणते. परंतु लोक कोणीही असो ते भारतीय होते आणि बदलापूरच्या लेकीसाठी एकत्र आले. हे सरकार असंवेदनशील आहे. इतके गलिच्छ सरकार आजपर्यंत मी पाहिले नाही. यावेळी महादेव बाबर, दिप्ती चौधरी, मोहोन जोशी, प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, संजय मोरे यांनी मनोगतातून निषेध व्यक्त केला.





