बदलापुरात आंदोलकांवर कारवाई ! 300 जणांवर गुन्हा दाखल, 40 जणांना अटक ; मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा निषेध

Badlapur case । बदलापूरमध्ये बालवाडीतील दोन मुलींच्या लैंगिक छळाच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या लोकांनी रेल्वे रोखून धरली. शाळेची तोडफोड करण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. दरम्यान ,आता याठिकाणची इंटरनेटसेवा देखील बंद करण्यात आली आहे. त्यातच या प्रकरणी कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणात आंदोलन करणाऱ्या सुमारे 300 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी 40 हून अधिक जणांना अटकदेखील केली आहे. अटक केलेल्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे ठाणे पोलिसांनी सांगितले.
अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट बंद Badlapur case ।
या घटनेबाबत मध्य रेल्वे जीआरपीचे डीसीपी मनोज पाटील यांनी माहिती दिली. “परिस्थिती सामान्य आहे. रेल्वेची वाहतूकही सामान्य आहे. आता कोणतेही कलम लावलेले नाही. अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट सेवा काही दिवस बंद राहणार आहे.” असे त्यांनी म्हटले. तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “१३ ऑगस्ट रोजी शाळेच्या स्वच्छतागृहात बालवाडीच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता”. 16 ऑगस्ट रोजी एका मुलीने आपल्या पालकांना ही घटना सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी अक्षय शिंदे याला १७ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती.
नेमकं काय घडलं बदलापुरात ? Badlapur case ।
ही बाब मंगळवारी उघडकीस आल्यानंतर हजारोंच्या संख्येने बदलापूर रेल्वे स्थानकावर जमा होऊन निषेध करण्यात आला. त्यामुळे 12 एक्सप्रेस आणि मेल गाड्यांचे मार्ग बदलावे लागले. ३० लोकल गाड्या अंशत: रद्द कराव्या लागल्या आणि काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले.
बदलापूर येथील आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि संतप्त लोकांनी दगडफेक करून शाळेची तोडफोड केली. बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ बसचेही नुकसान झाले. पोलिसांनी नऊ तासांनी लाठीचार्ज करून आणि रेल्वे रुळ साफ करून आंदोलन संपवले.
पीडित मुलींच्या पालकांनी आरोप केला आहे की पोलिसांनी १२ तासांनंतर त्यांची तक्रार नोंदवली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान पोलिसांना शाळेत लावण्यात आलेले सीसीटीव्ही काम करत नसल्याचे आढळून आले. मुलींचे स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती का करण्यात आली नाही, अशी चिंताही पालकांनी व्यक्त केली.
पीडित मुलींचे नातेवाईक शाळेत गेले आणि मुलींचे जबाब घेण्यासाठी पोलिस येण्यापूर्वी तीन तास थांबले. याप्रकरणी शाळेच्या व्यवस्थापनाने मुख्याध्यापक, वर्गशिक्षिका आणि महिला परिचर यांना निलंबित केले आहे. आरोपी स्वच्छता कर्मचारी अक्षय शिंदे याची 1 ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली होती.
या प्रकरणाच्या तपासात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र सरकारने एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह तीन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.





