दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या आगामी चित्रपटांची यादी मोठी आहे. यापैकी त्याच्या ‘द राजा साब’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील प्रभासचा फर्स्ट लुकही काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. हा लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. यामुळे द राजा साब चित्रपटाचा ट्रेलर आणि रिलीज डेटबाबात प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. मात्र, या चित्रपटाची रिलीज डेट काही कारणांमुळे पुढील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ‘द राजा साब’ हा हॉरर-रोमँटिक चित्रपट आहे. प्रभासने यापूर्वी अशा जॅानरच्या चित्रपटात काम केलेले नाही. त्यामुळे त्याच्यासाठीच नव्हे तर चाहत्यांसाठीही हा चित्रपट खास आहे. काही दिवसांपूर्वी 10 एप्रिल 2025 रोजी द राजा साब चित्रपट रिलीज होणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण आता तो रिलीजसाठी पुढे ढकलण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे बरेच काम बाकी आहे. काही गाणी आणि काही महत्त्वाच्या सीक्वेन्सचे शूटिंग व्हायचे आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या सेटवर प्रभास जखमी झाला होता. कोणत्याही कारणास्तव त्याचे संपूर्ण शूटिंगच्या शेड्यूलमध्ये चढ-उतार झाले आहे. याच कारणामुळे ‘द राजा साब’ आता वेळेवर पूर्ण होणार नाही. रिपोर्ट्सनुसार, ‘द राजा साब’चा क्लायमॅक्स सीन अजून शूट झालेला नाही. ज्याच्या शूटिंगला वेळ लागेल, तसेच याशिवाय प्रभासच्या इतर प्रोजेक्टेसाठीचीही काम सुरू आहे. त्यामुळे ‘द राजा साब’च्या शूटिंगला आणखी वेळ लागू शकतो, असे सांगितले जात आहे. द राजा साब दिवाळीत रिलीज होणार? आता हा चित्रपट दिवाळी 2025 च्या आसपास रिलीज होणार असल्याची बातमी आहे. मात्र, ‘द राजा साब’च्या निर्मात्यांनी अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. तसेच प्रभासच्या बाजूनेही याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे ‘द राजा साब’साठीही निर्मात्यांच्या घोषणेची वाट प्रेक्षकांना पाहावी लागणार आहे. प्रभासबद्दल सांगायचे झाले तर, तो ‘फौजी’, ’आत्मा’, ‘सालार 2’ आणि ‘कल्की 2898 एडी’च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे.