आळंदी – खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर परिसरातील मुख्य रस्ता चिखलमय झाला असून शाळकरी मुले, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक यांना जीव मुठीत धरून वाट काढावी लागत आहे. ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला हर घर नल या योजनेची सुरुवात करण्यात आली. जेसिबच्या माध्यमातून नाली खोदून पाईप लाईन टाकण्यात आली. त्यावेळी खोदण्यात आलेली माती रस्त्यावर टाकल्याने हा परिसर पूर्णतः चिखलमय झाला असल्याने येथील नागरिकांना रस्त्याने चालणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर चऱ्होलीचे सरपंच, उपसरपंच यांसह लक्ष्मीनगर येथील 25 नागरिकांनी काही दिवसांपूर्वी आमदार दिलीप मोहिते पाटील यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. रस्ता डांबरीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला. आमदार मोहिते यांनी नागरिकांची समस्या जाणून घेऊन प्रस्ताव मान्य केला तसेच चिखलमय झालेला रस्ता दुरुस्तीसाठी संबंधित ठेकेदार यांना मुरूम टाकण्यास सांगितले. मात्र काही ठिकाणीच मुरूम टाकण्यात आला असून बहुतांश रस्त्यांची स्थिती अद्याप जैसे थे आहे. तात्काळ उर्वरित मुरमिकरण करून रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी लक्ष्मीनगर परिसरातील नागरिक करत आहेत. दोन हजार लोकसंख्येची वस्ती – लक्ष्मीनगर परिसरात जवळपास पाचशे ते सहाशे घरे असून दोन हजार लोकवस्ती आहे. अंतर्गत रस्त्यासह मुख्य रस्ता चिखलमय झाल्याने सर्वच नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकी चालकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा दुचाकी घसरून अपघात होत आहेत. या समस्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी सुजाण नागरिक करत आहेत.