T20 captain : हार्दिक पांड्या होणार टीम इंडियाचा नवा T20I कर्णधार? जय शहांनी दिलं महत्वाचे अपडेट…

India’s next T20 captain – टी-20 विश्वचषकातील भारताच्या विजयाने ICC विजेतेपदांचा 11 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आला. T20 वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडिया बदलाच्या टप्प्यातून जाणार आहे. T20 वर्ल्ड कप 2024 संपल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला आहे. रोहित, कोहली आणि जडेजा यांच्या निवृत्तीमुळे भारत एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
टी-20 संघाचा संभाव्य कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याच्या भवितव्याबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना शाह यांनी पंड्याच्या विश्वचषकातील उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “निवडकर्ते कर्णधारपदाचा निर्णय घेतील. हार्दिकने स्वतःला सिद्ध केले आहे आणि आम्हाला त्याच्या क्षमतेवर विश्वास आहे.”
दरम्यान, हार्दिक पंड्याकडे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० सामने खेळण्याचा अनुभव आहे, जो इतर कोणत्याही स्पर्धकाकडे नाही. पंड्याने १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी १० सामने संघाने जिंकले आहेत. हार्दिक पंड्याने त्याच्या नेतृत्व क्षमतेच्या जोरावर गुजरात टायटन्सला पहिल्याच सत्रात आयपीएल २०२२ चे चॅम्पियन बनवले. २०२३ मध्येही त्याने संघाला अंतिम फेरीत नेले होते, मात्र संघ उपविजेता राहिला.
हार्दिक पंड्याने ५ द्विपक्षीय मालिकांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले, ज्यापैकी संघाने ४ जिंकल्या. मात्र, मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याची कामगिरी चांगली राहिली नाही आणि संघ गुणतालिकेत तळाशी राहिला. पंड्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४९२ धावा केल्या आहेत, पण कर्णधार म्हणून त्याला केवळ २९६ धावा करता आल्या. त्याच्या जोडीला जसप्रीत बुमराह व सूर्यकुमार यादव ही दोन नावेही चर्चेत आहेत. मात्र, बीसीसीआय पंड्याकडेच ही जबाबदारी सोपवेल असे चित्र सध्यातरी दिसत आहे.





