Sharad Kelkar : रावणाच्या आवाजाने पुन्हा चर्चेत! शरद केळकरच्या यशामागची संघर्षकहाणी माहितीये?
Sharad Kelkar : शरद केळकरचा जन्म ७ ऑक्टोबर १९७६ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. त्याचे बालपण आणि शिक्षण ग्वाल्हेरमध्येच झाले. त्याने सुरुवातीला एमबीएचे शिक्षण पूर्ण केले.

Sharad Kelkar : अभिनयासोबतच आपल्या भारदस्त आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे शरद केळकर. रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटामुळे शरद केळकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता यश आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, रावणाच्या व्यक्तिरेखेला आवाज देण्याची जबाबदारी शरद केळकरने सांभाळली आहे. त्याच्या भारदस्त आवाजामुळे या पात्राला एक वेगळीच ताकद मिळाली आहे.
मात्र, आज आपल्या आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या शरद केळकरचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. एकेकाळी आवाज चांगला नसल्याच्या कारणावरून त्याला नकाराचा सामना करावा लागला होता. पण याच आवाजाच्या जोरावर त्याने मनोरंजनविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आज अनेक कलाकारांच्या भूमिकांना त्याचा आवाज लाभत असून, तो एक लोकप्रिय व्हॉइसओव्हर आर्टिस्ट म्हणून ओळखला जातो.
ग्वाल्हेरमध्ये झाला जन्म; शिक्षणानंतर मनोरंजनविश्वात प्रवेश
शरद केळकरचा जन्म ७ ऑक्टोबर १९७६ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. त्याचे बालपण आणि शिक्षण ग्वाल्हेरमध्येच झाले. त्याने सुरुवातीला एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर फिजिकल एज्युकेशन इन्स्ट्रक्टर म्हणून काम केले. तसेच एका स्पामध्येही त्याने नोकरी केली. पुढे मॉडेलिंगच्या माध्यमातून त्याने मनोरंजनविश्वात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
मालिकांमधून सुरुवात; ‘बैरी पिया’ने मिळवून दिली ओळख
शरद केळकरने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली. २००४ मध्ये दूरदर्शनवरील ‘आक्रोश’ या मालिकेत सचिन कुलकर्णी ही भूमिका साकारत त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मात्र, २००९ मध्ये प्रसारित झालेल्या ‘बैरी पिया’ या मालिकेतील ठाकूर दिग्विजय सिंह भदौरिया या भूमिकेमुळे त्याला खरी ओळख मिळाली.
यानंतर ‘उतरन’ या लोकप्रिय मालिकेतही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली. अभिनयासोबतच ‘रॉक एन रोल’ आणि ‘पती पत्नी और वो’ यांसारख्या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालनही त्याने केले. छोट्या पडद्यावरील यशानंतर त्याने मोठ्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला.
‘लय भारी’पासून ‘तान्हाजी’पर्यंत
चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर शरद केळकरने हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ आणि मराठीतील ‘लय भारी’ या चित्रपटांमधील त्याच्या कामाचे विशेष कौतुक झाले. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या ऐतिहासिक चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. या भूमिकेनंतर त्याच्या करिअला कलाटणी मिळाली.
अभिनयासोबत आवाजाची जादू; ‘बाहुबली’मुळे मिळाली वेगळी ओळख
शरद केळकरच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याचे व्हॉइस डबिंग. ‘बाहुबली’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी प्रभासच्या व्यक्तिरेखेला दिलेला आवाज प्रचंड लोकप्रिय झाला. त्यानंतर त्याच्या भारदस्त आवाजाची जादू अनेक चित्रपटांमध्ये अनुभवायला मिळाली. ‘बाहुबली’, ‘आदिपुरुष’, ‘सलार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याचा आवाज ऐकायला मिळाला. त्यानंतर त्याने विविध भाषांमधील चित्रपटांसाठी आवाज देत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
Donald Trump: एनव्हिडियाच्या माजी CEO यांचा ट्रम्प यांना फोन ; ‘नरकयातना भोगतोय’ म्हणत काय सांगितलं?






