Bachchu Kadu : आता राज्यात पेटणार मशाल; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूचं उद्यापासून आंदोलन?

Bachchu Kadu : राज्य सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही.यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. दुसरीकडे कर्जाची पूर्ण रक्कम परत करावी लागणार असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत.
बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आता मशाल आंदोलन करणार आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकमधील निवासस्थानासमोर मशाल पेटवून उद्या रात्री 11 एप्रिल रोजी आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. तसेच राज्यभरातील प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहेत. शेतकर्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. Bachchu Kadu |
महायुतीत बच्चू कडू गेल्यावेळी मंत्री होते. पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी वेगळा घरोबा केला. विधानसभेत त्यांना आमदारकी टिकवता आली नाही. तरीही प्रहार संघटनेच्या माध्यमातून ते अनेकदा भूमिका घेताना दिसत आहेत. सध्या त्यांनी कर्जमाफीसाठी एल्गार पुकारला असून त्यांच्या या आंदोलनाची राज्यभर चर्चा होत आहे. Prahar Mashal Agitation |
हातात मशाल ,गळ्यात निळा दुपट्टा आणि भगवा झेंडा घेऊन आंदोलन
याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ज्या सरकारच्या धोरणामुळे आमच्या शेतकर्यांच्या घरातील दिवे विझायला लागले, त्या विरोधात आम्ही आंदोलन करू. शेतकर्यांच्या पालकत्व ज्यांच्याकडे आहे, ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहे. तसेच हातात मशाल, गळ्यात निळा दुपट्टा आणि भगवा झेंडा घेऊन आम्ही आंदोलन करणार आहे असं बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले.
रामचंद्राची शपथ ही बेइमानी आम्ही उकडून काढू
पुढे बोलताना म्हणाले, कर्जमाफीला सरकारकडे पैसे नाही, अपंगांना द्यायला पैसे नाही असे सरकार म्हणते. सरकारच्या धोरणामुळे शेतकर्यांचं नुकसान होत आहे. भगवा झेंडा घेऊन आणि रामचंद्राची शपथ घेऊन तुम्ही कर्जमाफी करणार म्हणून सांगितलं होतं. रामचंद्राला तर तुम्ही बेमान झालेच पण जनतेसोबत देखील बेमान झाले. प्रभू रामचंद्राची शपथ ही बेइमानी आम्ही उकडून काढू असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला. Agriculture Minister Manikrao Kokate |
जबाबदारी झटकत असाल तर गाठ प्रहारशी
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर देखील बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, माणिकराव कोकाटे तुम्ही कृषिमंत्री आहात, तुम्ही शेतकर्यांचे पालक आहात, मी त्यातला नाही, असं म्हणून जर तुम्ही जबाबदारी झटकत असाल तर गाठ प्रहारशी आहे, असा सज्जड दम बच्चू कडू यांनी कृषिमंत्र्यांनी दिला आहे.




