प्रभात वत्तसेवा चाकण – शेतकऱ्यांची कर्जमुक्ती न झाल्यास कोणत्याही सत्ताधारी पक्षाला मतदान करणार नाही, असा स्पष्ट इशारा देत प्रहार शेतकरी संघटनेचे नेते आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. खेड तालुक्यातील आंबेठाण येथे झालेल्या शेतकरी कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी संघटनेचे प्रणेते स्व. शरद जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शेतकरी कामगार महासंघ फाउंडेशन आणि समविचारी संघटनांनी केले होते. या वेळी बच्चू कडू यांनी शरद जोशी यांच्या स्मारकस्थळास भेट देत माती कपाळाला लावून अभिवादन केले. स्मारकाची व परिसराची दुर्दशा पाहून त्यांनी खंत व्यक्त केली. आपण सरकारला दोष देतो, पण स्मृतीस्थळी एक दिवस श्रमदान करावं असंही वाटत नाही, ही मानसिकता लज्जास्पद आहे, अशी टीका करत त्यांनी स्मारक उभारणीसाठी लवकरच प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं. या कार्यक्रमात शामराव पवार, नंदकिशोर लोखंडे पाटील, विठ्ठल राजे पवार, संतोष मांडेकर, अनिल भांडवलकर, बाळासाहेब वर्पे पाटील, गीताबाई मांडेकर, राजश्री गायकवाड, कांचन मांडेकर, बाजीराव नाना लोखंडे पाटील आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. बच्चू कडू म्हणाले, उन्नत महाराष्ट्र म्हणता म्हणता सहा महिन्यात १२०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. युद्धातही एवढे जवान शहीद झाले नाहीत. सरकार रोज माळ घालते, पण शेतकरी दररोज गळफास घेतोय, अशा शब्दांत त्यांनी शासनाच्या संवेदनशून्यतेवर घणाघात केला. नेते मरण पावल्यावर दुःख पाळलं जातं, पण ६.५ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी सरकारने एक दिवसही श्रद्धांजली दिली नाही. त्यामुळे ९ तारखेला आम्ही वेदनांचा धागा’ बांधणार आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. राखी पौर्णिमेनिमित्त आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ काळी राखी बांधून त्यांना आदरांजली वाहण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. वाहतूक कोंडीवरून मिश्किल टोला.. चाकणच्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे कार्यक्रमाला उशीर झाल्याचे नमूद करत, “पुण्यातून चालत आलो असतो, तर लवकर पोहोचलो असतो,” असे मिश्किल विधान करत बच्चू कडूंनी चाकणमधील वाहतूक कोंडीवरून शासनाच्या निष्क्रियतेवर टोला लगावला. २ ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन.. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत बच्चू कडूंनी २ ऑक्टोबरपासून आंदोलनाची घोषणा केली. “आतापर्यंत आम्ही गांधीगिरी केली, पण आता दाखापत्र आंदोलन होईल. ‘लाडकी बहिण’ योजना मतांसाठी आहे, पण आमची योजना शेतकऱ्यांची वेदना थांबवण्यासाठी आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.