बुलढाणा : प्रहार पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात आयोजित राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केले. रविवारी झालेल्या या परिषदेत बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून तीव्र संताप व्यक्त करत, “शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका,” असे विधान केले. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परिषदेला महादेव जानकर, दीपक केदार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या दुःखाची परिषद बच्चू कडू यांनी परिषदेला संबोधित करताना सांगितले की, ही परिषद म्हणजे शेतकऱ्यांच्या वेदनेची आणि दुःखाची परिषद आहे, जी दिवाळीसारख्या सणाच्या काळात घ्यावी लागत आहे. त्यांनी शेतकऱ्यांवर उपहासात्मक टिप्पणी करताना म्हटले, “शेतकऱ्याला विचारलं तर त्याला काहीच येत नाही. मग आत्महत्या का करता? आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापून टाका.” त्यांनी शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावे लागत असल्याने “बांगड्या भरा” असेही सांगितले. मोर्चे आणि प्रचाराला गर्दी होत असताना शेतकरी परिषदेला मात्र कमी उपस्थिती असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. जातीपातीच्या राजकारणावर टीका कडू यांनी शेतकऱ्यांनी विचाराची लढाई सोडून जातीपातीच्या लढाईला प्राधान्य दिल्याने शेतकरी मागे पडल्याची खंत व्यक्त केली. त्यांनी शरद जोशी यांचा उल्लेख करत म्हटले, “शरद जोशी यांनी अडीच लाखांचा पगार सोडून शेतकऱ्यांसाठी लढा दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी तलवारीने सुरू झालेली लढाई लेखणीने संपवली. पण शेतकऱ्यांनीच जोशी आणि आंबेडकरांना निवडणुकीत पाडले. मलाही शेतकऱ्यांनीच पाडले.” त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, जातीपेक्षा शेतकरी हित महत्त्वाचे आहे. “लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही कापूस आणि सोयाबीनला भाव मागितला का? तुम्ही फक्त जाती पाहिल्या. पण सर्व जाती या मातीमुळेच जगतात,” असे ते म्हणाले. सरकारवर बोचरी टीका सरकारवर टीका करताना बच्चू कडू यांनी सरकारची तुलना डुक्कराशी केली. “डुक्कर परवडलं पण सरकार परवडत नाही,” असे ते म्हणाले. शहरातील आमदारांना हप्ते वसूल करून मस्त आयुष्य जगता येते, पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. “तुमचा बैल तुमच्यापेक्षा बरा, त्याला तरी लाथ मारता येते,” असे उपहासात्मक वक्तव्यही त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला तर गाव सुखी होईल, पण जाती-धर्मात विभागल्याने शेतकरी एकत्र येत नसल्याने सरकारवर दबाव निर्माण होत नाही, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या एकजुटीचे आवाहन बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना एकजुटीचे आवाहन केले. “शेतकरी जर एकत्र आले तर सरकार एका दिवसात सरळ होईल,” असे ते म्हणाले. दीपक केदार यांनीही सरकारवर शेतकऱ्यांच्या अधोगतीसाठी जबाबदार ठरवत संताप व्यक्त केला. परिषदेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव, कर्जमाफी आणि इतर मागण्यांवर चर्चा झाली.