‘हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंवर…’, नीलम गोऱ्हेंच्या ‘त्या’ आरोपांवर बच्चू कडूंची मागणी

Bachchu Kadu | दिल्लीत 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. संमेलनात साहित्यिकांची मांदियाळी तर पाहायला मिळालीच, सोबतच राजकीय नेत्यांचीही गर्दी दिसून आली. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेवर (ठाकरे गट) केलेल्या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
‘उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या,’, असा आरोप गोऱ्हे यांनी केल्याने आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यातच आता प्रहार संघटनेचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांनी या वादात उडी घेतली आहे.
‘हिंमत असेल तर नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा’, असे आव्हान बच्चू कडू यांनी केले आहे. तसेच, असे आरोप करताना काही पुरावे द्यायला हवेत, असे देखील कडू म्हणाले.
नीलम गोऱ्हेंच्या आरोपांवर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, नीलम गोऱ्हे यांनी जर उद्धव ठाकरेंना मर्सिडीज गाड्या दिल्या असतील तर कोणत्या क्रमांकाच्या दिल्या ते सांगावे. नीलम गोऱ्हे यांच्याकडून आम्हाला या अपेक्षा नाहीत. कोणत्याही नेत्याने कोणत्याही नेत्यांच्या विरोधात बोलायचं असेल तर काही संदर्भ किंवा काही पुरावे द्यायला हवे. कोणतेही पुरावे न देता आपण बोलत असू तर ते योग्य नाही.
‘त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल केला पाहिजे. नीलम गोऱ्हे या उपसभापती आहेत. त्यांनी असे बिनबुडाचे आरोप करू नयेत.’, असे म्हणत त्यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, साहित्य संमेलनातील कार्यक्रमात बोलताना गोऱ्हे यांनी ‘ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या दिल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे.’, असा आरोप केला होता. त्यावरून राज्यात ठाकरे गट व शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय राऊत यांनी गोऱ्हेंच्या आरोपाला उत्तर दिले आहे. ‘नीलम गोऱ्हे यांचे कालचे विधान म्हणजे त्यांची विकृती आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ही कोणती बाई तुम्ही पक्षात आणली? काही लोकांच्या मर्जीमुळे त्या आल्या अन् गेल्या. 4 वेळा आमदार झाल्या. परंतु जाताना ताटात घाण करुन गेल्या.’, असे म्हणत त्यांनी सडकून टीका केली आहे.





