Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली असून, शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक येवला येथे पाहायला मिळाला. माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (23 मार्च) शेतकरी आक्रोश मोर्चा येवला प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. कांद्याच्या दराबाबत नाराजी व्यक्त करत आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी बच्चू कडू यांनी स्वतः प्रांताधिकारी कार्यालयावर कांदे फेकत निषेध नोंदवला. त्यांच्यासोबत उपस्थित शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर कांदेफेक करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, सरकारने तातडीने हस्तक्षेप करून दरवाढीबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. या आंदोलनामुळे राज्यातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.