Bacchu Kadu : बच्चू कडूंना मोठा दिलासा; 2018 च्या मारहाण प्रकरणात तुरुंगवास टळला

Bacchu Kadu News : माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना 2018 च्या एका प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने सरकारी अधिकाऱ्याला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 5 हजार रुपये दंड ठोठावला होता. या निकालामुळे कडू यांना तुरुंगात जावे लागणार होते, परंतु उच्च न्यायालयाने त्यांच्या अपीलपर्यंत शिक्षेला स्थगिती देत जामीन मंजूर केला आहे. यामुळे कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काय आहे प्रकरण?
2018 मध्ये बच्चू कडू आणि त्यांच्या सात ते आठ सहकाऱ्यांनी राज्य सरकारच्या आयटी विभागाचे तत्कालीन संचालक आणि उपसचिव यांना घेराव घातला होता. महापरीक्षा पोर्टलच्या तक्रारींवर अहवाल देण्याची मागणी कडू यांनी केली होती.
मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी अधिकाऱ्याच्या टेबलावरील आयपॅड उचलून त्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि “बघून घेईल” अशी धमकी दिली. या घटनेचे चित्रिकरणही झाले होते, ज्याचा वापर पुरावा म्हणून करण्यात आला. मुंबई सत्र न्यायालयाने कडू यांना सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला आणि धमकी दिल्याप्रकरणी दोषी ठरवले आणि त्यांना तीन महिन्यांची साधी कैद आणि दंडाची शिक्षा सुनावली.
कोर्टाची कडू यांच्या वर्तनावर नाराजी
मुंबई सत्र न्यायालयाने कडू यांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. कोर्टाने म्हटले की, कडू यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता अधिकाऱ्याला धमकावले, जे अयोग्य आहे. सरकारी अधिकाऱ्यांना निर्भयपणे काम करण्यासाठी अशा घटनांना कठोर शिक्षेद्वारे आळा घालणे गरजेचे आहे. त्यामुळे कडू यांना शिक्षा सुनावण्यात आली होती.
काय म्हणाले बच्चू कडू?
शिक्षेच्या निकालानंतर बच्चू कडू यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले, महापरीक्षा पोर्टलमध्ये मोठा घोटाळा झाला होता, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. सुविधांचा अभाव होता आणि आयटी संचालकांनी आमच्या मागण्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आम्ही जाब विचारण्यासाठी गेलो. त्या वेळी मी लॅपटॉप उचलला, ज्यावरून माझ्याविरुद्ध तक्रार दाखल झाली.





