Babanrao Lonikar : शेतकऱ्यांविरोधात बोलणार नाही; मुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतर लोणीकरांना उपरती

जालना : अनेकांच्या आईचे पगार आम्ही केले. त्यांच्या बापाला पेरणीला पैसेही आम्हीच दिले, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप आमदार बबनराव लोणीकर यांना आता उपरती झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी समज देण्याची भाषा केल्यानंतर लगेचच लोणीकरांनी यापुढे आपल्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांविरोधात काहीही बोलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मंत्री लोणीकर ट्रोलर्सना उद्देशून म्हणाले होते, ते कुचळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे… त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी 6 हजार रुपये पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले. तुझ्या पायातील बूट व चप्पल आमच्यामुळेच आहेत. तुझ्या हातातले डबडे, तो मोबाइल देखील आमच्यामुळेच आहे.
आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचेच घेतो आणि आम्हालाच बोलतो का? आमचे घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का? असे ते म्हणाले होते. बबनराव लोणीकरांच्या या विधानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची एकच झोड उठली. पत्रकारांनी याविषयी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी लोणीकरांचे विधान पूर्णपणे चुकीचे असल्याचे नमूद करत त्यांना समज देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर काही वेळातच लोणीकरांनी यापुढे आपण अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांविरोधात केव्हाच बोलणार नसल्याचे स्पष्ट केले.





