बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: पोलिसांकडून एका भंगार विक्रेत्याला अटक

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणी दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या घटनेत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचीही माहिती समोर आली होती. या प्रकरणी एका भंगार विक्रेत्याला रविवारी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत असून आतापर्यंत १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. आज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी मूळचा राजस्थानमधील उदयपूरचा रहिवासी असल्याची माहिती सांगितली जात आहे. या आरोपीने १२ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. भगवंत सिंग (३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे.
तो नवी मुंबईत भंगार विक्रेत्याचे काम करत होता. त्याच्या अटकेनंतर एकूण आरोपींची संख्या १० वर पोहोचली आहे. भगवंत सिंग या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, भगवंत सिंगने आरोपींना पुरवलेले शस्त्र कोठून आणले होते? त्याने ते शस्त्रे कसे पुरवले? तो राजस्थानमधून शस्त्रे घेऊन मुंबईत आला होता का? अशा सर्व गोष्टीचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येणार आहे.





