Baba Siddique : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड झीशान अख्तरला कॅनडा पोलिसांकडून अटक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार झीशान अख्तर उर्फ जस्सी पुरेवाल याला कॅनडा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिस दलातील सूत्रांनी याची पुष्टी केली आहे. झीशान सध्या कॅनडा पोलिसांच्या ताब्यात असल्याची आपल्याकडे ठोस माहिती असल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे.
मुंबई पोलिस आता झीशान अख्तरचे प्रत्यार्पण करुन त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरु करु शकतात. झिशान अख्तर देश सोडून गेल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता त्याला कॅनडातील सरे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, ही अटक कोणत्या प्रकरणात करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. १२ ऑक्टोबर २०२४ च्या रात्री बाबा सिद्दीकींची त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकीच्या ऑफिसबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
गँगस्टर लॉरेन्स गँगने या हत्येची जबाबदारी घेतली. बाबा सिद्दीकींचा बॉलीवूड स्टार सलमान खानशी जवळचा संबंध होता. म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली, असा दावा लॉरेन्स टोळीने केला. लॉरेन्स गँगचे सलमान खानशी जुने वैर आहे. पोलिस तपासात असे दिसून आले की, सिद्दीकींच्या हत्येमागील सूत्रधार जालंधरचा रहिवासी झीशान अख्तर होता. हत्येनंतर तो परदेशात पळून गेला. त्यानंतर असा दावा करण्यात आला की पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीने त्याला पळून जाण्यास मदत केली होती.





