Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ‘त्या’ 26 आरोपींवर….

Baba Siddique murder case : काही दिवसांपूर्वी (12 ऑक्टोबर) मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची भरचौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली होती. बाबा सिद्दिकी हे आपला मुलगा झिशान सिद्दिकी यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आले होते.त्याचवेळी आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टींचा उलघडा होताना दिसत आहे.
बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला, या गोळीबारात तीन आरोपींचा समावेश होता. त्यातील दोघांना पोलिसांनी तात्काळ पकडलं मात्र एक जण गर्दीचा फायदा घेऊन फरार झाला होता. सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत एकूण 26 जणांना अटक करण्यात आली असून त्यात संशयित मुख्य शूटर शिवकुमार गौतमचा समावेश आहे.
आता या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी 26 आरोपींवर मोक्का (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ॲक्ट) लावला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103(1), 109, 125 आणि 3(5), शस्त्रास्त्र कायद्याचे कलम 3, 5, 25 आणि 27 आणि कलम 37 आणि 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम (एमपीए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर शुभम लोणकर, जिशान मोहम्मद अख्तर हे आरोपी वाँटेड आहेत. सिद्दिकींची हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे.
हत्येच्या दिवशी काय घडले?
बाबा सिद्दिकी चिरंजीव आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या खेरवाडी सिग्नलजवळ असलेल्या कार्यालयाकडे जात असताना बाबा सिद्दिकींवर तीन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दिकी यांच्यावर एकूण 5 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या.
त्यातली एक गोळी त्यांच्या छातीजवळ लागली होती. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यापूर्वी त्याठिकाणी फटाके फोडण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. विशेष म्हणजे बाबा सिद्दिकी यांना 10-15 दिवसांपूर्वी धमकी देखील देण्यात आली होती.





