B. Sudershan Reddy : बी. सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीचा हा उमेदवारी अर्ज आपण अत्यंत नम्रतेने आणि संविधानात नमूद केलेल्या मूल्यांप्रती अढळ वचनबद्धतेने दाखल केला आहे. माझे जीवन लोकशाही परंपरांमध्ये सामावलेले आहे; भारताची खरी ताकद प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेत सामावली आहे असे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शने रेड्डी यांनी म्हटले आहे. आपला अर्ज दाखल केल्यानंतर ते आज बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून, संसदीय लोकशाहीच्या सर्वोच्च परंपरांचे रक्षण करण्याची जबाबदारी उपराष्ट्रपतींवर आहे. जर निवडून आलो तर निष्पक्षता आणि संवादासाठी दृढ वचनबद्धतेने माझी भूमिका बजावण्याची मी प्रतिज्ञा करतो. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बी. सुदर्शन यांचे नाव जाहीर केले होते. गुरुवारी बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
नामांकन अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. यापूर्वी बुधवारी एनडीएच्या वतीने सी.पी. राधाकृष्णन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नामांकन अर्ज दाखल करताना काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक विरोधी नेते उपस्थित होते. यावेळी उपराष्ट्रपती पदासाठी राधाकृष्णन आणि सुदर्शन या दोघांमध्येच लढत होत असून निवडणूक ९ सप्टेंबर रोजी आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे.





