प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) राबविण्यात येत असलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदवी (बी. फार्मसी) अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीची निवड यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. या फेरीत एकूण ६ हजार ९२१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना पुढील दोन दिवसांत त्यांना मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचे आहेत.यंदा फार्मसीची शिखर संस्था असलेल्या पीसीआयच्या मान्यतेला झालेल्या विलंबामुळे बी. फार्मसी प्रवेश प्रक्रिया रखडली होती. पहिल्या फेरीत २९ हजार १६६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळूनही, प्रत्यक्षात केवळ १६ हजार ६७० विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला होता. दुसऱ्या फेरीत हा आकडा आणखी घसरून ८ हजार १३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. दुसऱ्या फेरीपूर्वी प्रवेश बंदी घालण्यात आलेल्या १८ पैकी १३ महाविद्यालयांवरील बंदी उठवण्यात आल्याने सुमारे ८५० जागा वाढल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर होण्यापूर्वी भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेने (पीसीआय) उर्वरित महाविद्यालयांवरील प्रवेश बंदीही मागे घेतली. त्यामुळे जागांच्या संख्येत पुन्हा भर पडली. तिसऱ्या फेरीसाठी एकूण ४६ हजार १०९ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ६ हजार ९२१ विद्यार्थ्यांना या फेरीत महाविद्यालये अलॉट करण्यात आली आहेत. मात्र, तिसऱ्या फेरीनंतरही तब्बल १४ हजार ८९ विद्यार्थी अद्याप प्रवेशाविना राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विलंबाचा फटका.. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांना दरवर्षी पीसीआयकडून मान्यता घ्यावी लागते. यंदा या प्रक्रियेला ३० सप्टेंबरपर्यंत विलंब झाला. याचा थेट परिणाम बी. फार्मसी आणि डी. फार्मसी या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेवर झाला. सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जवळपास चार महिन्यांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली. ज्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.