वाघोलीत लसीकरण श्रेयवाद नागरिकांच्या जीवावर

Updated On:

पुणे : भारतीय जैन विद्यालयातील लसीकरण केंद्र (बी.जे.एस.) एका रात्रीत वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. लसीकरणासाठी आवश्‍यक कोणतीही यंत्रणा सज्ज नसताना तसेच कोणतीही पूर्व सूचना न देताच रात्रीच्या रात्रीत राजकीय खेळातून सदर केंद्र वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आल्याने नागरिकांची मोठी धावपळ आणि गोंधळ उडाला.

वाघोली येथील भारतीय जैन विद्यालयात सुमारे 8 ते 10 हजार चौरसफूट हॉलमध्ये गेल्या चार महिन्यांपासून लसीकरण केंद्र सुरू होते. सुमारे 17 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे येथे लसीकरण झाले आहे. लसीकरणाकरीता सर्व आवश्‍यक यंत्रणा येथे उपलब्ध असताना केवळ लोकप्रतिनिधींच्या श्रेयवादातून हे लसीकरण केंद्र कोणतीही पूर्व सूचना न देताच तसेच कोणतीही तयारी नसताना एका रात्रीत प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी प्रायोगिक तत्त्वावर गृह निर्माण सोसायटींमध्ये लसीकरण सुरू केल्यानंतर त्याला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागल्यानंतर हा वाद सुरू झाला. या वादातूनच केंद्र हलविण्याचा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे.

 

‘आयसीएमआर च्या नियमानुसार ज्या जागेत केंद्राची मान्यता आहे त्याच जागेत सेंटर सुरू ठेवता येते. वाघोलीचे केंद्राचे ठिकाण प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने तेथे लसीकरण केंद्र हलविण्यात आले. बीजेएस येथे सुरू करण्यात आलेले केंद्र मान्यतेचे नव्हते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पत्र दिल्यास तेथेही मान्यता घेऊन स्वतंत्र केंद्र सुरू करता येईल.’
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

‘माझे अधिकार घ्या.., मात्र नागरिकांच्या जीवाशी राजकारण करून खेळू नका. केंद्र हलवताना मलाही विचारण्यात आले नाही. ही राजकारण करण्याची वेळ नाही. वॉर्डनियाह सेंटर सुरू करून लसीकरण वाढवा, तशी मागणी मी केली आहे. माझ्यासाठी नागरिकांची सुरक्षितता महत्वाची आहे. एका रात्रीत सेंटर हलविणे यामागे केवळ घाणेरडे राजकारण आहे. पुरेशी जागा नसतानाही तेथे सेंटर सुरू करून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू करण्यात आला आहे.’
– ज्ञानेश्वर कटके, जिल्हा परिषद सदस्य

‘मी पुरेशा मोठ्या जागेत जेथे नागरिकांची सर्व व्यवस्थित सोय होईल, अशा ठिकाणी केंद्र सुरू ठेवावे, असे सांगितले होते. त्यासाठी शासनाची परवानगी पाहिजे असेल तर घ्या, असेही सांगितले होते. मात्र, तेथे छोट्या जागेत का केले हे अधिकाऱ्यांना विचारावे लागेल.’
– आमदार अशोक पवार

कोणत्या नियमातून केंद्र सुरू?

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्टहाऊस मध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून तेथे केवळ दोन छोट्या खोल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना बसण्याकरिताही पुरेशी जागा नाही. लसीकरणानंतर नागरिकांची तपसणी, विश्रांती कक्ष अशी कोणतीही सुविधा नाही. जागे अभावी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. नागरिकांना भर उन्हात उभे रहावे लागत असून बसण्यासाठीही जागा नाही. चार चाकी येण्यासाठी रस्ता नाही, अशा ठिकाणी कोणत्या नियमातून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले, अशी चर्चा नागरिकांत आहे.

हे प्रश्‍न अनुत्तरीतच…

  • बीजेएस येथे मन्यता नव्हती तर चार महिने केंद्र कसे सुरू राहिले ?
  • आय.सी.एम.आर.चा नियम आताच का लावण्यात आला ?
  • मान्यता नसलेल्या ठिकाणी केंद्र चालविले, मग अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?
  • प्राथमिक आरोग्य केंद्रात यंत्रणा नसताना तेथे केंद्र कसे हलविले ?
  • सार्वजनिक बांधकामच्या गेस्टहाऊस मध्ये सेंटर कसे सुरू केले ?
  • लसीसाठी गोंधळ उडाल्याने डिस्टनसिंगचा फज्जा उडाला, जबाबदार कोण ?

आणखी संबंधित बातम्या

वाघोलीतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १६७ वर !

2020-07-20 16:28:23

वाघोलीतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १६७ वर !

वाघोलीतील कोरोना रुग्णांच्या आकड्याने पन्नाशी ओलांडली !

2020-07-06 21:27:35

वाघोलीतील कोरोना रुग्णांच्या आकड्याने पन्नाशी ओलांडली !

वाघोलीतील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय नियमांची कडक अंमलबजावणी करणार

2020-07-06 21:21:49

वाघोलीतील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय नियमांची कडक अंमलबजावणी करणार