लखनौ : उत्तरप्रदेशातील ज्येष्ठ नेते आझम खान समाजवादी पक्षाची (सप) साथ सोडतील, अशा चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र, स्वत: खान यांनी अप्रत्यक्षपणे तशी शक्यता फेटाळून लावली. तसेच, सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही खान पक्षासोबतच असल्याची स्पष्टोक्ती केली. उत्तरप्रदेशचे माजी मंत्री असणारे खान सुमारे २ वर्षे तुरूंगात होते. न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने ते मंगळवारी तुरूंगाबाहेर आले. सप सोडून बसप किंवा इतर पक्षात प्रवेश करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर असे दावे करणाऱ्यांनाच विचारा, असे सूचक उत्तर त्यांनी दिले. अखिलेश यांनी इतरत्र पत्रकारांशी बोलताना खान यांच्या संभाव्य पक्षबदलाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. खान हे सपचे संस्थापक सदस्य आहेत. त्यांनी समाजवादी चळवळीत महत्वाचे योगदान दिले. ते सप आणि आमच्यासोबतच आहेत, असे ते म्हणाले. खान यांच्या विरोधात अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ते गुन्हे उत्तरप्रदेशात सपचे सरकार आल्यानंतर मागे घेतले जातील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. अखिलेश यांचे काका शिवपाल यादव यांनीही खान यांच्या पक्षबदलाची चर्चा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली.