आयुष्मान खुराणा यांचा ‘सूर्यभूषण’ने गौरव

पुणे, दि. 17 – लोकप्रिय अभिनेता आयुष्मान खुराणा यांना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे “सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. फिल्मफेअर पुरस्कार विजेते खुराणा यांनी आपल्या कारकिर्दीबद्दल संवाद साधत असताना विद्यार्थ्यांना प्रेरणात्मक उदाहरणे दिली आणि व्यक्तिमत्व विकासासाठी टिप्स दिल्या.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सहायक उपाध्यक्ष स्नेहल नवलखा, कार्यकारी विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनच्या सूर्यदत्त इन्स्टिटयूट ऑफ मास कम्युनिकेशन अँड इव्हेंट मेनेजमेन्टच्या वतीने अभिनेता आयुष्मान खुराणा यांचा विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने खुराणा यांनी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटसच्या बावधन संकुलास भेट दिली. याप्रसगी संस्थेचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया यांनी सिडनी येथून ऑनलाइनद्वारे आयुष्मान आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. खुराणा यांनी पुरस्काराबद्दल आभार व्यक्त केले. तसेच सूर्यदत्तला दुसऱ्यांदा भेट देणार असल्याचे नमूद केले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. पुण्याशी चित्रपटामुळे जोडले गेल्याचे त्यांनी नमूद केले. “आय लव्ह यू सूर्यदत्त’ असे म्हणत त्यांनी सूर्यदत्त संस्थेवरील प्रेम स्पष्ट केले.





