Ayushman Bharat Yojana : दिल्लीत आजपासून आयुष्मान भारत योजना लागू; लाभार्थ्यांना मिळणार वार्षिक 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा

नवी दिल्ली : आजपासून दिल्लीत आयुष्मान भारत योजना लागू करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यासाठी केंद्र आणि दिल्ली सरकार यांच्यात करार झाला. या योजनेअंतर्गत, निर्धारित उपचार खर्चाच्या ६० टक्के केंद्र आणि ४० टक्के दिल्ली सरकार देईल. दिल्लीमध्ये ही योजना लागू झाल्यानंतर, लाभार्थ्यांना वार्षिक ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळेल. याशिवाय, दिल्ली सरकार ५ लाख रुपयांचे अतिरिक्त टॉप-अप देखील देईल.
आयुष्मान भारत योजना लागू करणारे दिल्ली हे ३५ वे राज्य बनले आहे. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता उपस्थित होत्या. दिल्लीतील सर्व भाजप खासदारांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, दिल्ली सरकारचे मंत्री आणि सर्व भाजप खासदार यावेळी उपस्थित होते.
केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव म्हणाल्या की, या करारामुळे सार्वत्रिक आरोग्य कव्हरेजचे उद्दिष्ट पूर्ण होईल. दिल्लीतील सर्व आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, तृतीयपंथी यांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळेल. या करारामुळे निरोगी भारत, विकसित भारताचे ध्येय साध्य होईल. आता पश्चिम बंगाल वगळता सर्व राज्ये आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत आली आहेत.
काय म्हणाले वीरेंद्र सरदेवा?
दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, आम्ही पोकळ आश्वासने आणि खोटा प्रचार करत नाही. आज दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारमध्ये आयुष्मान भारत योजनेबाबत एक सामंजस्य करार झाला. आम्ही १० एप्रिलपासून नोंदणी सुरू करू. लवकरच गरजू लोकांना त्याचा लाभ घेता येईल. भाजपने दिल्लीतील जनतेला दिलेल्या वचनबद्धतेच्या दिशेने आम्ही पुढे जात आहोत. आम आदमी पक्षाप्रमाणे आम्ही पोकळ आश्वासने कधीच दिली नाहीत.





