‘आव्हाडांचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे महाराष्ट्र द्रोह; आदित्य ठाकरेंनी उत्तर द्यावे’

मुंबई : ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर काल कारवाई केली. या कारवाई दरम्यान ११ फ्लॅटवर ईडीने टाच आणली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांविरोधात कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईवर प्रतिक्रिया देताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.
केंद्रीय यंत्रणांच्या नावाने राज्यातील प्रशासकीय यंत्रणा वसूलीचे षडयंत्र रचत असल्यास चौकशी करणार! (1/2)@BJP4Maharashtra @BJP4Mumbai#Day13#BudgetSession2022#maharashtraassembly pic.twitter.com/DZGNPpoHDi
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 23, 2022
वृत्तवाहिनीशी बोलताना आव्हाड यांनी तपास यंत्रणांचा वापर करुन राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे त्यावर आता वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. पण माझं मत विचाराल तर मी माझ्या पोरीला महाराष्ट्रात ठेवणार नाही असे वक्तव्य राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तसेच त्यांच्या मुलीला नुसतं चौकशीला बोलवलं तरी ती आत्महत्या करेल असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे.
यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला आहे. आशिष शेलार म्हणाले,’ राज्याच्या सरकारमधील मंत्रीमहाराष्ट्राबद्दल असं गंभीर वक्तव्य करत असेल आणि जगभरात आणि देशभरात महाराष्ट्र हे बिकट परिस्थितीत चाललेलं राज्य आहे असा प्रचार करत आहेत, तर हा महाराष्ट्र द्रोह नाही तर काय आहे? यावर आदित्य ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी.” अस म्हणत आदित्य ठाकरेंना शेलार यांनी जाब विचारला आहे.





