अवयवदान चळवळ व्यापक होण्यासाठी जनजागृतीची गरज – गिरीष महाजन

छत्रपती संभाजीनगर – अवयवदान श्रेष्ठ दान आहे. आपण मृत्यूनंतर आपले अवयवदान करून अनेकांचे प्राण वाचवू शकतो. पाश्चिमात्य देशात 10 हजार लोकसंख्येमागे अवयवदान करणाऱ्यांची संख्या 3500 आहे तर हेच प्रमाण आपल्या देशात केवळ 1 आहे. यामुळे अवयवदानाची चळवळ व्यापक होण्यासाठी सर्वांनी याबाबत जनजागृती करणे महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
राज्यस्तरीय “अवयवदान जनजागृती अभियान’चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथे पार पडले. यावेळी केंद्रीय वित्तमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे आदी उपस्थित होते.
महाजन म्हणाले, देशात अवयवदानाविषयी म्हणावी तेवढी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुवर्ष प्रतिक्षेत आहेत. अवयवदान हे केवळ डोळे आणि किडनीपुरते मर्यादित नसून शरीरातील विविध अवयव आपण दान करु शकतो. पण यासाठी आवश्यक आहे ती पुरेशी माहिती आणि इच्छाशक्ती. आपण केलेल्या अवयवदानामुळे अनेकांना जीवदान मिळू शकते.
म्हणून याबाबत जागृती होणे आवश्यक आहे. राज्यस्तरीय अवयवदान जनजागृती अभियान’चे उद्घाटन झालेले आहे. आता या चळवळीला व्यापक करणे आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले. सध्या स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे तर तरुणांमध्ये मुख कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे.
ग्रामीण भागातील महिलांमध्ये बचत गटातील महिलांमार्फत स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. तरुणांनी देखील व्यसनापासून दूर राहुन शरीर निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम करावा. घाटी रुग्णालयातील रिक्त पदांची देखील लवकरच पदभरती केली जाईल. निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले. पैठण येथे 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले.





