‘स्किझोफ्रेनिया’वर मात करण्यासाठी जागरुकता हवी

पुणे -“स्किझोफ्रेनिया’ हा आजार रुग्णाच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम करतो. मात्र, या आजाराची लक्षणे समजून घेतली तर या आजारवर मात करता येऊन रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो.’स्किझोफ्रेनिया’ या विकाराबद्दल जागरुकता वाढवण्याच्या उद्देशाने दि. 24 मे रोजी “जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस’ पाळला जातो. हा एक “क्रॉनिक डिसऑर्डर’ असून, यामुळे व्यक्तीचे विचार, वर्तन आणि भावनांवर परिणाम होतो. खोटे-खरे यातील फरक करणे कठीण होते. यंदाच्या वर्षीची थीम ही “सेलिब्रेटिंग दी पॉवर ऑफ कम्युनिटी काइंडनेस’ अशी आहे.
हा एक गंभीर आणि जुना मानसिक आजार आहे. ज्याने जगभरातील सुमारे 24 दशलक्ष लोक ग्रस्त आहेत. म्हणजे प्रत्येकी 300 व्यक्तींमागे एकाला हा विकार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. स्किझोफ्रेनिया हा पर्यावरणीय घटक, आनुवंशिकता आणि काही न्यूरोलॉजिकल कारणांमुळे होतो. औषधे आणि थेरपीने ते नियंत्रित केले जाऊ शकते. योग आणि ध्यान या आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.
स्किझोफ्रेनिया हा एक मनोविकार आहे. त्यामुळे पीडित व्यक्तीच्या विचार, समज आणि वागण्यात बदल होतो. हा रुग्ण विनाकारण प्रत्येक गोष्टीवर आणि व्यक्तीवर संशय घेतो आणि त्याच्या जगात हरवून जातो. तो आवाज ऐकतो, जे खरोखर तेथे नाहीत. याशिवाय, त्याला नेहमी असे वाटते की कोणीतरी आपल्याविरुद्ध कट रचत आहे किंवा आपल्याला चुकीच्या पद्धतीने एखाद्या प्रकरणात अडकवले जात आहे. या मानसिक आजारामुळे त्या व्यक्तीला इतरांचे चांगले बोलणे किंवा सल्ला खोटा वाटतो.
लक्षणे :
अवास्तव, असंबंध अशा गोष्टी सांगणे
एकटे राहायला आवडते
गर्दीच्या, सार्वजनिक ठिकाणी कार्यक्षमता कमी होणे
वारंवार मूड बदलणे, नैराश्याची लक्षणे
शारीरिक हालचालींवर परिणाम करणे आणि सुस्त होणे
गोंधळलेल्या स्थितीत असणे आणि त्यातील काहीही खरे नसताना विचित्र गोष्टी जाणवणे
परिस्थितीनुसार भावना, मूड आणि भूमिका समजून घेण्यास असमर्थता
हे करा :
स्किझोफ्रेनियाबद्दल समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी मदत करा.
त्याची लक्षणे आणि कारणे जाणून घ्या; त्याप्रमाणे उपचाराची दिशा ठरवा.
या आजाराच्या माहितीसाठी पुस्तके, शैक्षणिक जर्नल्स, अन्य समाजमाध्यमे, वेबसाइट, तज्ज्ञ व्यक्ती या सगळ्यांकडून माहिती गोळा करा.
या आजाराने ग्रस्त व्यक्तींशी बोला, त्यांचे मन जाणून घ्या, त्यांचे अनुभव शेअर करून घ्या.
अशा आजाराने ग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबीयांशी आणि मित्रांशी बोला, वस्तुस्थितीवर चर्चा करा.





