पुणे जिल्हा | वेल्हे तालुक्यात मतदारांमध्ये इव्हीएमबाबत जनजागृती

विंझर (वार्ताहर) – येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मतदारामध्ये मतदान यंत्राबाबत जनजागृती करणेचे काम वेल्हे तालुक्यामध्ये सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा निवडणूक अधिकारी,
निवडणूक निर्णय अधिकारी, स्वीप नोडल अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली १० सप्टेंबर २०२४ पासून ते ९ ऑक्टोंबरपर्यंत मतदारांमध्ये इव्हीएम तसेच व्हीव्हीपॅटसंदर्भात जनजागृती मोहीम कार्यक्रम चालू आहे.
त्याअनुषंगाने वेल्हे तालुक्यातील वेल्हे, विझर मंडलातील मालवली, लाशिरगाव, विझर इ. महसुली गावात मतदारांमध्ये या मोहिमेस उदंड प्रतिसाद मिळत आहे.
इव्हीएम मशिन हाताळणे, दिलेल्या उमेदवारास मत मिळाले आहे की नाही, हे व्हीव्हीपीएटीवर तपासणे याबाबत डेमो करुन मतदारांच्या मनात इव्हीएम मशिनबाबत दृढ विश्वास निर्माण करणेसाठी स्विप कार्यक्रमांतर्गत प्रयत्न होत आहेत.
मतदारांमध्ये जनजागृती करत असताना मतदान यंत्राविषयी विविध गैरसमज दूर करणेत येत आहेत. इव्हीएम यंत्राबाबत उत्सुकता म्हणून अबालवृध्दांचा मतदान जनजागृती मोहिमेस देखील उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
२०३ भोर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार निवास ढाणे, निवडणूक नायब तहसीलदार उत्तम बढे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंडल अधिकारी,
तलाठी मतदार जनजागृती मोहीम यशस्वीरित्या पार पाडत आहेत. या मतदार जनजागृती मोहिमेत मंडलाधिकारी. राजपाल यादव, माधव केंद्रे यांनी उपस्थित मतदारांना याप्रसंगी मार्गदर्शन केले.
९ ऑक्टोबरपर्यंत कार्यक्रमांचे आयोजन
येत्या काळात दि. ९ ऑक्टोबरपर्यंत उर्वरित महसुली मंडलात म्हणजेच आंबवणे, पानशेत, पासली या सर्कलमधील महसुली गावामध्ये इव्हीएम जनजागृती कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
तरी सर्व नागरिकांनी या जनजागृती मोहिमेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आव्हान २०३ भोर विधानसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी तथा परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी पुनम अहिरे यांनी केले आहे.





