Pimpri : विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती

चिंचवड : चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालय व क्वीक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला.
संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड शहर, रुपीनगर, तळवडे, लोणावळा परिसरातील शाळा, महाविद्यालयात, भाजी मंडई, बस स्थानके येथे जाऊन जनजागृती व मार्गदर्शन केले.
या जनजागृती उपक्रमातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या १२ विद्यार्थ्यांचा क्वीक हील फाउंडेशनच्या प्रमुख अनुपमा काटकर, संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, किर्लोस्कर ग्रुपचे माणिकराव पाटील, अजय शिर्के, गायत्री केसकर, डॉ. जयश्री मुळे, डॉ. हर्षिता वाच्छानी, प्रा. सुप्रिया गायकवाड आदींच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
डॉ. जयश्री मुळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. हर्षिता वाच्छानी, प्रा. उज्वला फलक यांनी जनजागृतीची माहीती चित्रफीतीद्वारे विशद केली. हर्षिता वाच्छानी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी बटूल परवाला, आमना शेख यांनी तर दिपू सिंग यांनी आभार मानले.





