ग्रामपंचायत रणधुमाळी : दोन महिला आल्या अन् घोळ झाला…

अवसरी (पुणे) – अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर खालच्या शिंदेमळा वॉर्डमधील एकाच नावाच्या दोन महिला मतदान करण्यासाठी आल्याने उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. तसेच बाचाबाची झाली; परंतु मंचर पोलिसांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर मतदान पुर्ववत सुरू करण्यात आले.
अवसरी खुर्द ग्रामपंचायतीचे सहा सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत, उर्वरीत 11 जागांसाठी मतदान पार पडले. उमेदवार आणि कार्यकर्ते मतदांराना वाड्यावस्त्यांवर जावून मतदान करण्यासाठी केंद्रावर घेवून येत होते. तसेच मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली होती. अभंगमळा, गावठाण, शिंदेमळा, टेमकरमळा, कौलीमळा येथील मतदारांसाठी हायस्कूलमध्ये मतदान केंद्र होते.
खालच्या शिंदेमळा वॉर्डमध्ये एकाच नावाच्या दोन महिला मतदार असल्याने एक महिला मतदान करून गेली. त्यानंतर त्याच नावाची दुसरी महिला मतदानासाठी आल्याने मतदान केंद्रावर गोंधळ उडाला. उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली; परंतु मंचरचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, पोलीस जवान विनोद गायकवाड, गणेश डावखर यांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
मतदान कक्षात प्रवेश करताना काही ठिकाणी मतदाराचे तापमान तपासून सोडले जात होते. तर काही कक्षात सॅनिटायरचा वापर केला जात होता. गावठाण आणि शिंदेमळा या केंद्रांवर मतदाराच्या लांब रांगा लागल्या होत्या.
अपंग आणि वयस्कर मतदारांची हेळसांड…
जिल्हा परिषद शाळेची इमारत नूतनीकरण करावयाचे असल्याने मतदान श्री काळभैरवनाथ विद्यालयात घेण्यात आले; परंतु अपंग व वयस्कर व्यक्तींना मतदानकक्षापर्यंत जाण्यासाठी रॅम्प नसल्याने अपंग व्यक्तींना पायऱ्या चढून जावे लागल्याने त्रास सहन करावा लागत.
प्रशासनाचा भोंगळ कारभार…
प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार पाळणा घर मतदान केंद्र करण्यात आले होते; मात्र पाळणा घरासाठी स्वतंत्र खोली देण्यात आली नव्हती. येणाऱ्या लहान मुलांना अंगणवाडी सेविका घेऊन एका बाकड्यावर बसलेले चित्र आढळून येत होते. तसेच या लहान मुलांना पिण्यासाठी पाणी किंवा बिस्कीट अशी व्यवस्था पहावयास मिळाली नाही.




