पुणे : शहरात नागरिकांना दररोज पाणी, ड्रेनेज, कचरा अशा समस्यांचा सामना करावा लागतो. नगरसेवक कार्यरत असताना नागरिक त्यांच्याकडे तक्रारी करतात मात्र, आता नगरसेवकांचा कार्यकाळ संपला असल्याने नागरिकांच्या या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने सक्षम आणि तत्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारावी अशी मागणी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
पक्षाच्या शिष्टमंडळाने याबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर वैशाली बनकर, माजी उपमहापौर दिपक मानकर, दिलीप बराटे, माजी सभागृह नेते नगरसेवक सुभाष जगताप, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे, बाबुराव चांदेरे, अश्विनी कदम, सचिन दोडके, प्रदीप धुमाळ, शहर समंन्वयक महेश हांडे यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, प्रशासकाच्या कालावधीत शहरातील कोणत्याही नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी नियोजनबद्ध काम केले जाणार असून त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार असल्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं.