पालघर : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर पालघरच्या सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचे बंधू अतिश मोरे यांना मारहाण केल्या प्रकरणात अविनाश जाधव यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर मोरे यांच्या भावावर काही गुंडांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आहे . मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडून हल्ला करण्यात आल्याचा मोरे कुटुंबीयांचा आरोप आहे. पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांचे भाऊ अतिश मोरे यांच्यावर बोईसर मधील शगुन रुग्णालयात उपचार सुरू आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक काळात दिलेली जबाबदारी पार पाडली नसल्याची तक्रार काही मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांनी केली. पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची कानउघाडणी केली आणि हाच राग मनात धरून अविनाश जाधव यांनी हा हल्ला केल्याचं मोरे यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ‘या’ अंतर्गत गुन्हा दाखल अखेर कुटुंबाच्या आरोपानंतर अविनाश जाधव यांच्यावर कलम 118 (1) , 189 (2 ), 189 (4) 191 (2) , 191 ( 3) प्रमाणे सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.