टाटा मोटर्सने बरेच संशोधन आणि विकास केल्यानंतर नवनव्या कार सादरीकरणाचा धडाका चालू ठेवला आहे. त्याचाच भाग म्हणून टाटा हॅरिअर सादर करण्यात आली असून एक्सई मॉडेल 12.69 लाख रुपयांपासून सुरू होते तर एक्सझेड मॉडेल 16.25 लाख रुपयांत पडते. टाटा हॅरिअर चार प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. हे वाहन ओमेगा प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आले असून, ते लॅंड रोव्हरच्या 8डी प्लॅटफॉर्मशी सुसंगत आहे.
त्याशिवाय टाटा हॅरिअर इम्पॅक्ट 2.0 डिझाईन फिलॉसॉफीनुसार विकसित करण्यात आले आहे. 2018 च्या ऑटो एक्स्पोमध्ये टाटा समूहाने एच 5 एक्स ही संकल्पना प्रदर्शित केली होती. यातील बरीच वैशिष्ट्ये टाटा हॅरिअरमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे दिसून येते. या प्रकारातील गाड्यांमध्ये टाटा हॅरिअर सर्वात मोठी आहे. त्याचबरोबर हिचा फूटप्रिंट स्पर्धकांपेक्षा जास्त आहे.
ही गाडी पाहिल्यानंतर प्रथम नजरेत भरते ती बाब म्हणजे या गाडीचे डिझाईन अत्याधुनिक आहे. ही शहरासाठी विकसित करण्यात आलेली एसयूव्ही असून ती या अपेक्षेला पूर्णपणे उतरते.
प्रॉजेक्टर हेडलॅम्प आणि एलईडी लॅम्प ही या गाडीची आणखी नजरेत भरणारी वैशिष्ट्ये आहेत. ही गाडी समोरून बाजूने आणि मागच्या बाजूनेही आकर्षक दिसेल यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात आले आहेत. फूटप्रिंट जास्त असल्यामुळे चालकांसाठी ऐसपैस जागा उपलब्ध झाली आहे. मागच्या सीटवरील व्यक्तीसाठी भरपूर जागा असून, अंतर्गत सजावट उत्तम आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये ही गाडी लोकप्रिय होऊ लागली आहे. एलईडी डे टाईम लाईट, एचआयडी झेनॉन हेडलॅम्प उपलब्ध करण्यात आलेले आहे. टचस्क्रिन इम्फोटेनमेंटचा आकार तब्बल 8.8 इंचाचा आहे त्यामुळे चालकाला टचस्क्रिनसह पाहता येते. त्याचबरोबर आतील स्पिकर उच्च दर्जाचे आहेत. दुहेरी एअरबॅग्ज एबीएस आणि ईबीडीमुळे गाडीची सुरक्षितता वाढली आहे. गाडीचे इंजिन 2.0 लिटर, 4 सिलिंडर डिझेल इंजिन असून, यातील कमी घर्षणामुळे गाडी फारसा आवाज करीत नाही.