ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे शेअर बाजारात पुन्हा पडझड, ऑटो शेअर्स धडाधड कोसळले; या स्टॉकला बसला सर्वाधिक फटका

Auto stocks fall | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात आयात होणाऱ्या सर्व विदेशी कारवर 25 टक्के टॅरिफ लावण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे आता परदेशातून अमेरिकेत येणाऱ्या कारवर 25% आयात शुल्क आकारलं जाईल. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील पाहायला मिळाला आहे. यामुळे ऑटो क्षेत्रातील शेअर्सच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली.
ट्रम्प यांच्या निर्णयानंतर निफ्टी ऑटो इंडेक्स 1 टक्क्यांनी घसरला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, अशोक लेलँड, आइशर मोटर्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. याशिवाय, एमआरएफ, अपोलो टायर्स, भारत फोर्ज, उनो मिंडा, बॉश लिमिटेड, बाळकृष्ण इंडस्ट्रीज या ऑटो पार्टस बनविणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सची किंमत देखील कमी झाली.
ट्रम्प यांच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका टाटा मोटर्सच्या शेअरला बसला आहे. कंपनीचे शेअर्स आज जवळपास 5.47 टक्क्यांनी घसरून 669.50 रुपयांवर आले. तसेच, ट्रम्प यांच्या या निर्णयाचा जगभरातील ऑटो क्षेत्रातील कंपन्यांवर परिणाम दिसून आला आहे. टोयोटा, होंडा, निसान, मित्सुबिशी मोटर, मित्सुबिशी मोटरसह चीनच्या अनेक कंपन्यांना याचा फटका बसला आहे.
ट्रम्प यांचा निर्णय काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशी कार उत्पादकांना मोठा धक्का दिला आहे. आता अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व विदेशी कारवर 25 टक्के टॅरिफ लावण्यात येणार आहे. म्हणजेच, ज्या कार अमेरिकेत बनलेल्या नाहीत, त्यांच्यावर 25% आयात शुल्क आकारले जाईल. मात्र, जर एखादी विदेशी कंपनी अमेरिकेतच कार बनवत असेल, तर त्या कारवर कोणतेही टॅरिफ लागणार नाही. हा निर्णय मागे घेणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.





