Cricket Australia : इंग्लंड आणि स्कॉटलंड विरूध्दच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर, वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार टीमच्या बाहेर…

Australia Squad for SCO and ENG : ऑस्ट्रेलिया सप्टेंबर महिन्यात स्कॉटलंड आणि इंग्लंड यांच्याविरूध्द पांढऱ्या चेंडूची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया 4 सप्टेंबरपासून स्कॉटलंडविरुद्ध तीन सामन्यांची द्विपक्षीय टी-20 मालिका खेळणार आहे. दुसरीकडे, ते 11 सप्टेंबरपासून इंग्लंडविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ज्यामध्ये 3 टी-20 आणि 5 एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे, ज्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय पॅट कमिन्सचा संघातून बाहेर पडण्याचा आहे. या मालिकेत मिचेल मार्श ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार आहे.
पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क संघाबाहेर…
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विश्वचषक विजेता कर्णधार पॅट कमिन्स या मालिकेत खेळणार नाही. त्याला विश्रांती देण्यात आली आहे. तसेच वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही टी-20 मालिकेतून बाहेर होणार आहे. या दोन्ही खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत घेण्यात आला आहे. कमिन्सच्या अनुपस्थितीत मिचेल मार्श संघाचे नेतृत्व करेल. मार्शने नुकत्याच झालेल्या अमेरिका आणि कॅरेबियनमध्ये झालेल्या 2024 टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्वही केले आहे.
जेक फ्रेजर-मॅकगर्कचा संघात समावेश
टी-20 विश्वचषकासाठी राखीव खेळाडू म्हणून प्रवास केल्यानंतर युवा फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्कचा एकदिवसीय आणि टी-20 या दोन्ही संघांमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच स्पेन्सर जॉन्सन, झेवियर बार्टलेट आणि ॲरॉन हार्डी या युवा व नवोदित खेळाडूंना देखील संधी देण्यात आली आहे.
टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ : मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झाम्पा.
एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ : मिच मार्श (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲलेक्स कॅरी, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ॲरॉन हार्डी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा.





